काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरीपदी सौ. प्रभावती घोगरे यांची निवड!
◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून अभिनंदन आणि सत्कार
संगमनेर LIVE | अहिल्यानगर जिल्हा हा काँग्रेस विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नुकत्याच जाहीर झालेल्या नवीन समितीमध्ये लोणी येथील सौ. प्रभावती घोगरे यांची राज्य जनरल सेक्रेटरी पदी निवड झाली आहे. त्यामुळे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संगमनेर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
यशोधन जनसंपर्क कार्यालयात सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ. पद्माताई थोरात, सौ. शितल उगलमुगले, सौ. मीना थेटे, अमोल घोगरे, सचिन मुन्ना आहेर, दीपक विखे, शामराव घोगरे, दीपक घोगरे, सौ. जयाताई गाडे, गौतम आहेर, सुभाष गुंजाळ यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
सौ. प्रभावती घोगरे यांनी कृषि क्षेत्रात आदर्शवत काम केले असून महिलांचे मोठे संघटन केले आहे. राहाता मतदार संघातील काँग्रेसच्या नेत्या असून त्यांनी विधानसभेची निवडणूक काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढवली होती. मोठा जनसंपर्क, सहज संवाद, कृषि प्रधान संस्कृती आणि जनसेवेचा समर्थ वारसा, यामुळे त्या जिल्ह्यातील महिलांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या जनरल सेक्रेटरी त्यांची निवड झाली आहे.
यावेळी माजी मंत्री थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्षाला मोठी परंपरा असून काँग्रेस पक्षाने महिलांसाठी ५० टक्के आरक्षण आणले आहे. महिला सबलीकरणासाठी अनेक योजना राबवताना अन्नसुरक्षा कायदा, आरोग्य सुरक्षा, माहितीचा अधिकार, याचबरोबर देशाने साधलेली प्रगती ही काँग्रेस पक्षाच्या काळातील आहे. काँग्रेसचे योगदान कोणीही नाकारू शकणार नाही. देशाची राज्यघटना आणि लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेसचा विचार हा अत्यंत गरजेचा असून सध्या वाढलेले धार्मिक राजकारण हे देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने चिंतेचे आहे.
सौ. प्रभावती घोगरे म्हणाल्या की, आपण कायम सर्वसामान्य शेतकरी गोरगरीब यांच्या हिताचा विचार केला आहे. काँग्रेस पक्षाने आपल्यावर मोठा विश्वास टाकला. माझ्या निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रीय नेत्या प्रियांका गांधी या उपस्थित होत्या. मात्र राहाता विधानसभेमध्ये निवडणूक प्रक्रियेची झालेला गोंधळ सर्व देशाला माहीत झाला आहे. यापुढील काळात महिला सबलीकरणासाठी अधिक सक्रियतेने काम करू असे त्या म्हणाल्या.
दरम्यान घोगरे यांच्या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, जिल्हाध्यक्ष जयंतराव वाघ, शहराध्यक्ष दीप चव्हाण, माजी नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, सौ. लताताई डांगे, अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे, सौ. पद्माताई थोरात, सौ. अर्चनाताई बालोडे, सौ. प्रमिला अभंग यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.