ज्ञानेश्वरी महाकाव्य हे मानवतेला दिशा देणारे - बाळासाहेब थोरात
◻️ संगमनेर कारखान्यावरील अमृतेश्वर अखंड हरिनाम सप्ताह दीपोत्सव संपन्न
संगमनेर LIVE | वारकरी संप्रदायाला शेकडो वर्षाची परंपरा असून विविध जाती धर्मातील संतांनी प्रेमाचा व समतेचा संदेश सर्वांना दिला आहे. ज्ञानेश्वरी पारायण हा अमृता अनुभव असून ज्ञानेश्वरांचे ज्ञानेश्वरी हे महाकाव्य संपूर्ण विश्वाला दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथील अमृतेश्वर मंदिरात ४० व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या दीपोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सौ. कांचनताई थोरात, कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग घुले, हभप गोविंद महाराज करंजकर, हभप चंद्रलेखाताई काकडे, संचालक नवनाथ आरगडे, योगेश भालेराव, रामनाथ कुटे, अंकुश ताजने, विनोद हासे, ॲड. बाबासाहेब गायकर, सौ. लताताई गायकर, ॲड. अशोक हजारे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे, कार्याध्यक्ष रामदास तांबडे, हभप अरुण महाराज फरगडे, संदीप दिघे, नवनाथ गडाख, अशोक मुटकुळे, हभप अरुण जोंधळे, राजू बड यांच्यासह अमृत सांस्कृतिक मंडळाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, अमृतेश्वर मंदिरातील या सप्ताहाला मोठी समृद्ध परंपरा आहे. स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात, हभप गावडे महाराज व कलामाई यांच्या प्रेरणेतून हा सप्ताह मागील ४० वर्षापासून सुरू आहे. ज्ञानेश्वरी गाथा पारायण यावर्षी ३५१ महिलांचा सहभाग असून ज्ञानेश्वरी पारायण हा जीवनातील अमृत अनुभव आहे. प्रत्येकाने एक तरी ओवी अनुभवावी असे सांगताना वारकरी संप्रदायाला मोठी परंपरा आहे. पंढरपूरचा पांडुरंग हे आराध्य दैवत म्हणून विविध जाती धर्मातील सर्व संतांनी समतेचा बंधुतेचा व प्रेमाचा संदेश दिला आहे. द्वेषला कुठेही थारा नाही. हा समतेचा बंधू भावाचा मंत्र आपल्याला जपायचा आहे. महाकवी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी प्राकृत भाषेत आपल्याला दिली विश्वाच्या कल्याणासाठी त्यांनी विचार आपल्याला दिले. हे महाकाव्य मानवतेच्या कल्याणासाठी आहे.
जगामध्ये सध्या युद्ध सुरू आहेत भारतामध्ये अशांती आहे अशा परिस्थितीमध्ये वारकरी संप्रदायाचे निर्मळ तत्त्वज्ञान उपयोगी ठरणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सुरू असून महिलांची मोठी उपस्थिती आणि ज्ञानेश्वरी पारायण हे या सप्ताहाचे वैशिष्ट्य राहिले आहे. दीपोत्सव हा आनंदाचा क्षण असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असल्याचे ते म्हणाले.