आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नामुळे पोकळीस्त नोंदी रद्द!
◻️ इंदिरानगर भागातील रहिवाशांनी व्यक्त केला आनंद
संगमनेर LIVE | संगमनेर शहरातील इंदिरानगर भागात मागील ४० ते ५० वर्षापासून अनेक कुटुंबे राहत आहेत. मात्र, त्यांना जागेचा प्रत्यक्ष ताबा असूनही महसूल नोंदवहीत अजून ही काही बाह्यव्यक्तींच्या नावाने पोकळी नोंदी आढळून येत आहेत. आम्ही अनेक वेळा मागील सरकारच्या काळात प्रयत्न केले मात्र, त्यांचा काही उपयोग झाला नाही. उलट आमचा हा महत्त्वाचा प्रश्न आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नामुळे मार्गी लागला आहे. परंतु, काही न करता ते आता श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. अशा भावना इंदिरानगर परिसरातील काही नागरीकानी व्यक्त केल्या.
मागील अनेक दशकांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरातील सर्वे नंबर १०६ (४४२) या क्षेत्रात ४० ते ५० वर्षापासून अनेक कुटुंबं राहत असून, ते नियमितपणे घरपट्टी व नळपट्टीसारखे स्थानिक कर भरत आहेत. त्यांच्याकडे प्रत्यक्ष ताबा असूनही महसूल नोंदवहीमध्ये अजूनही काही बाह्यव्यक्तींच्या नावाने पोकळीस्त नोंदी आढळून येत आहे.
त्यामुळे या भागात राहणाऱ्या रहिवाशांच्या मालकी हक्काच्या प्रमाणपत्रांवर गंडांतर येत होते. सदर पोकळीस्त नोंदी रद्द करून प्रत्यक्ष रहिवाशांच्या नावे ७/१२ उतारे व सिटी सर्वे अभिलेख अद्ययावत करण्यात यावेत, अशी मागणी अनेक वर्षापासून केली जात होती. मात्र यापूर्वी या प्रश्नाकडे दुर्लक्षच झाल्याचां आरोप स्थानिक नागरिकांनी केला.
या पार्श्वभूमीवरती पावसाळी अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांनी सरकारचे लक्ष वेधले. त्यामुळे महसूल मंत्री बावनकुळे यांनी आमदार खताळ यांच्या पाठपुराव्याची दखल घेत या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे लवकरचं तांत्रिक व कायदेशीर प्रक्रियेनंतर येथील रहिवाशांना मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.