अण्णाभाऊना भारतरत्न मिळावा यासाठी पाठ पुरावा करणार - आमदार खताळ
◻️ संगमनेर येथे लहुजी शक्ती सेना आणि महायुतीच्या वतीने अभिवादन
संगमनेर LIVE | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लेखणीच्या माध्यमातून ब्रिटिश राजवटीच्या विरोधात अन्यायाचा प्रतिकार करणारे लेखन करत समाजप्रबोधन केले. त्यामुळे त्यांना भारतरत्न मिळावा यासाठी आपण विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही. आमदार अमोल खताळ यांनी दिली.
लहुजी शक्ती सेना आणि महायुतीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त आमदार खताळ यांनी अभिवादन केले. यावेळी महायुतीचे प्रमुख पदाधिकाऱ्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ पुढे म्हणाले की, महापुरुषांच्या स्मृतींना आणि त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरे केले जात असतात. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे कमी शिकलेले असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून शोषित व वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना खऱ्याअर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी कायम संघर्ष केला. त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचाराचा वारसा घेऊन आपण सर्वजण मार्गक्रम करू या, असे आवाहन केले.
दरम्यान शहरातील नवीन नगर रोड लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक दुर्लक्षित झाल्याची खंत समाज बांधवांनी व्यक्त केली. त्यावर आमदार खताळ यांनी नगरपालिकेला स्मारकासह परिसराचे सुशोभीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.