डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्याची पायी दिंडीत सेवा
◻️ पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात संगमनेरच्या पाचशे युवक व युवती वारकऱ्यांचा सहभाग
संगमनेर LIVE | वारकरी संप्रदायाच्या विचारांची पाईक असलेले महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात संगमनेर तालुक्यातील पाचशे युवक कार्यकर्त्यानी पंढरपूरच्या पायी वारी दिंडीमध्ये सहभाग घेतला. यावेळी त्यांनी वारकऱ्यांच्या आरोग्य यासह दोन दिवस विविध सेवा दिल्या.
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रातील अनेक पायी दिंडी या पंढरपूरकडे येत आहेत. या दिंडीतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर व तालुक्यातील पाचशे तरुण व तरुणींनी या पायी दिंडी सोहळ्यामध्ये आम्ही संगमनेरी, विठुरायाचे वारकरी या उक्ती खाली सहभाग घेतला.
संगमनेर, अहिल्यानगर मार्गे या दिंडीने संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे टेंभुर्णी येथे दर्शन घेऊन येथील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी सह स्वच्छता, जेवण वाढणे, यांसह इतर सेवा दिली. या दिंडीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील आणि पायी दिंड्या सहभागी झाले आहेत. या ७० किलोमीटरच्या प्रवासात ठिकठिकाणी वारकऱ्यांशी संवाद, मुक्काम, स्वयंपाकांमध्ये सहभाग, वाढण्यामध्ये सहभाग, स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी यांसह डॉ. जयश्रीताई थोरात यांनी वारकऱ्यांशी मुक्त संवाद साधला. यावेळी विविध गावांमध्ये डॉ.जयश्रीताई थोरात यांचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. थोरात म्हणाल्या की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कायम वारकरी संप्रदायाची विचारधारा जोपासली आहे. मानवता हा धर्म जोपासणारा वारकरी विचार असून यामध्ये लहान, मोठा, उच्च, जात पाहत असा कोणताही भेदभाव नाही. सर्वजण माऊली म्हणून एकमेकांचा आदर करत आहेत. पाया पडतात, संत महात्म्यांनी सुरू केलेली पायी दिंडी ही महाराष्ट्राची उज्वल परंपरा असून संपूर्ण जगाला एकतेचा संदेश देत असल्याच्या त्या म्हणाल्या.
यावेळी विविध ठिकाणी विविध कीर्तनकार सहभागी वारकरी महिला वृद्ध युवक या सर्वांशी त्यांनी संवाद साधला. आम्ही संगमनेरी विठुरायाचे वारकरी हे ब्रीदवाक्य घेऊन युवकांनी वारकऱ्यांची केलेली सेवा ही सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे. यावेळी या सर्व वारकऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यातील करकम येथील रिंगणामध्ये ही सहभाग घेत वारकरी रिंगणाचा आनंद लुटला. या रिंगणामध्ये माऊली माऊलीच्या गजरात डॉ. जयश्री थोरात डोक्यावर तुळस घेऊन सहभागी झाल्या. या रिंगणासाठी सुमारे दोन ते अडीच लाख वारकरी उपस्थित होते.
थोरात परिवाराला वारकरी संप्रदायाची परंपरा - खासदार लंके
थोरात परिवाराला समाजकार्याची व वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कायम सर्वांना सोबत घेऊन समाज विकासाचे काम केले आहे. हीच शिकवण वारकरी संप्रदायाने दिली आहे. गोरगरिबांची सेवा करणे हीच खरी ईश्वर सेवा असून डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात तरुणांनी वारीमध्ये सहभाग घेऊन सेवा दिली. हा कौतुकास्पद उपक्रम असल्याचे ते म्हणाले. यावेळी खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांसाठी प्रसाद वाटपाच्या कार्यक्रमप्रसंगी सौ. राणीताई लंके आणि पदाधिकारी उपस्थित होते.