संगमनेरसाठी आणखी ३४ पशुवैद्यकीय दवाखान्याची गरज - आमदार अमोल खताळ
संगमनेर LIVE | संगमनेर तालुका हा दुग्ध उत्पादनात राज्यामध्ये अग्रेसर असून तालुक्यात ५८ पशुवैद्यकीय दवाखान्यांची गरज आहे. मात्र सध्या संपूर्ण तालुक्यात फक्त २४ पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत आहेत. मात्र दिवसेंदिवस दुधाळ जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे तालुक्यात ३४ पशुवैद्यकीय दवाखान्यांना राज्याचे पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी मान्यता द्यावी अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत केली.
संगमनेर तालुक्यात दुधाळ जनावरांची संख्या १ लाख ८० हजार असून शेळी - मेंढ्यांची संख्या २ लाख, कोंबड्यांची संख्या ४ लाख ५० हजार आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी संपूर्ण तालुक्यात फक्त २४ पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत आहेत. त्यामुळे पशुपालकांना सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत. पशुवैद्यकीय दवाखाने कमी असल्यामुळे दूध उत्पादकांना नाईलाजास्तव खाजगी सेवा घ्याव्या लागतात व त्यासाठी त्यांना अधिकचा पैसा खर्च करावा लागतो.
सद्य स्थितीत दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना तो परवडत नाही. त्यामुळे तालुक्यात २४ पशुवैद्यकीय दवाखान्यांची निर्मिती व्हावी जेणेकरून शेतकऱ्यांना कमी दरात पशु वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळेल आणि त्यांचा उत्पादनखर्च कमी होईल. यासाठी पशुसंवर्धन मंत्र्यांनी संगमनेर तालुक्यात ३४ नवीन पशु वैद्यकीय दवाखाने निर्मिती करण्यास तात्काळ मान्यता द्यावी. अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली.