हेरंब कुलकर्णी यांना एक लाख रुपयांचा गिरीश गांधी पुरस्कार जाहीर
◻️ ६ जुलै रोजी डॉ. अभय बंग यांच्या हस्ते यांच्या होणार पुस्तकांचे वितरण
संगमनेर LIVE (अकोले) | राज्यभरात आपल्या सामाजिक कार्यासाठी ओळखले जाणारे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांना नागपूर येथील १ लाख रुपयांचा गिरीश गांधी सामाजिक व राजकीय कार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. वर्धा येथील सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रमात ६ जुलै रोजी डॉ. अभय बंग यांच्या हस्ते व मीनाक्षी नटराजन (नवी दिल्ली) यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाणार आहे. अशी माहिती भारती झाडे व पत्रकार विकास झाडे यांनी दिली.
सी. मो. झाडे फाऊंडेशन, नागपूरच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्रातर्फे गिरीश गांधी सामाजिक राजकीय कार्य पुरस्कार दिला जातो.
हा पुरस्कार आतापर्यंत डॉ. एस. एन. सुब्बाराव, डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. रवी व डॉ. स्मिता कोल्हे, संजय नहार, डॉ. सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख, पारोमिता गोस्वामी यांना प्रदान करण्यात आला आहे.
कुलकर्णी यांनी नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर अनेक सामाजिक कार्याना वाहून घेतले. त्यांनी एकल महिला, भटके विमुक्त, दारुबंदी, वंचितांचे शिक्षण आणि बालविवाह या विषयांवर लक्षणीय काम केले आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या ८० तालुक्यांमध्ये साऊ एकल महिला समितीचे नेटवर्क उभारले आहे.
त्यांच्या कार्यात एकल महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, स्वयंरोजगार सुरू करणे आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणे यांचा समावेश आहे.
दारुबंदीसाठी त्यांनी विविध आंदोलने केली आणि अवैध दारूविरुद्ध कार्य केले. महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यात फिरून दारिद्रयाचा अभ्यास केला आहे. बालविवाह विषयावर राजस्थान, बिहार मध्ये जाऊन अभ्यास केला आहे. बालविवाह विषयावर पुस्तक पुढील आठवड्यात प्रसिद्ध होते आहे. त्यांची १२ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
कुलकर्णी यांनी सामाजिक प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्यावर कृती आधारित उपाययोजना करणे, सामाजिक संघटना कार्यकर्ते एकत्र आणणे अशा प्रकारे कामाची पद्धत आहे.
या पुरस्कार वितरणानिमित्त मजबुती का नाम महात्मा गांधी नावाचे १०० तरुणांचे २ दिवसांचे वैचारिक शिबिर ही आयोजित करण्यात आले असून देशातून अनेक मार्गदर्शक यासाठी येत आहेत. हेरंब कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत ही होणार आहे.
दरम्यान ज्या महात्मा गांधींच्या प्रेरणेने अंतिम आदमीसाठी काम करावेसे वाटते. त्या सेवाग्राम आश्रमात हा पुरस्कार मिळतो आहे याचा आनंद आहे. असे हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.