मान्सुन लांबल्याने जलसंपदा मंत्री ना. विखे पाटील यांच्या सूचनानंतर आवर्तन सुरू
◻️ पिण्याच्या पाण्याची टंचाई दुर तर, खरीपाच्या पिकांना आवर्तनामुळे दिलासा मिळणार
◻️ अकोले, संगमनेर, श्रीरामपूर आणि नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार लाभ
संगमनेर LIVE (लोणी) | भंडारदरा लाभक्षेत्राकरीता सिंचन आणि बिगर सिंचनाचे एकत्रित आवर्तन जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुचनेनंतर दिनांक १ जून २०२५ पासून तातडीने सुरु करण्यात आले असून, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची गरज लक्षात घेवून विभागाने तातडीने आवर्तन सोडण्याची कार्यवाही केली आहे.
लाभक्षेत्रात मान्सुनचा पाऊस लांबल्याने शेती तसेच गावागावातील पाणी योजनांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. या संदर्भात आ. विठ्ठलराव लंघे यांच्यासह श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री विखे पाटील यांची मुंबई येथे भेट घेवून आवर्तन सोडण्याची मागणी केली.
या संदर्भात मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या आधिकाऱ्यां समवेत चर्चा करुन, लाभक्षेत्रात पाण्याची असलेली वाढती मागणी, शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तनाचे नियोजन एकत्रितपणे करण्याच्या सुचना दिल्या व याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जलसंपदा विभागाने १ जूलै २०२५ रोजी रात्री सिंचन व बिगर सिंचनाचे एकत्रित आवर्तन सोडण्यात आले आहे.
सिंचन आणि बिगर सिंचनाच्या एकत्रित आवर्तनासाठी भंडारदरा धरणातून १४०० क्युसेस पाणी सोडण्यात आले असून, या आवर्तनामुळे अकोले, संगमनेर, श्रीरामपूर आणि नेवासे तालुक्यातील काही गावांना लाभ मिळेल. खरीपाच्या पिकांनाही या आवर्तनाचा दिलासा मिळणार असून, काही गावांमधील पिण्याच्या पाण्याची टंचाई दुर होणार आहे. शेवटच्या गावापर्यंत आवर्तनाचे पाणी मिळण्यासाठी जलसंपदा विभागाने योग्य नियोजन केले असून, कुठेही पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना स्थानिक आधिका-यांना दिल्याचे विभागाचे अभियंता स्वप्निल काळे यांनी सांगितले.