रिमझिम पावसात अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या चिमुकल्यांची आषाढी दिंडी
◻️ चिमुकल्या ३०० विद्यार्थ्यानी विविध वेशभूषा करत विठ्ठल नामाचा केला गजर
◻️ आषाढी वारीच्या दिंडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
संगमनेर LIVE | आषाढी वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असून अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या ३०० विद्यार्थ्यानी विठ्ठल, रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, मुक्ताबाई अशा वेगवेगळ्या वेशभूषा करून रिमझिम पावसात विठ्ठल नामाचा गजर करत ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा पर्यावरणाचा संदेश देत आषाढी वारीचे दर्शन घडविले.
अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या ३०० लहान विद्यार्थ्यांनी संगमनेर बस स्थानक, नवीन नगर रस्ता, जाणता राजा मैदान, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निवासस्थान, ते यशोधन अशी वारी काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी सौ. कांचनताई थोरात यांनी या चिमुकल्या वारकऱ्यांचे स्वागत केले.
रिमझिम पाऊस ‘झाडे लावा झाडे जगवा’ ‘जल है तो कल है’ ‘एक बच्चा एक झाड’ या घोषणा देत या चिमुकल्यांनी संगमनेर शहर दणाणून सोडले. यावेळी महाराष्ट्राची उज्वल परंपरा सांगणाऱ्या विविध संतांची वेशभूषा करून हातात, डोक्यावर तुळशी वृंदावन, विना अशी वेगवेगळी वेशभूषा करून ही वारकरी दिंडी संगमनेर मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
यावेळी सौ. कांचनताई थोरात म्हणाल्या की, पंढरपूरची वारी हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे. आषाढी वारीमध्ये महाराष्ट्रातील गोरगरीब, भोळाभाबडा, असे सर्व नागरिक व महिला सहभागी होतात. यामध्ये कधीही भेदभाव होत नाही. एकमेकाला माऊली म्हणून त्यांचा आदर करतात. अमृतवाहिनी मॉडेल स्कूलचे विद्यार्थी दरवर्षी संगमनेर मधून सुंदर दिंडी काढतात. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दिलेले दंडकारण्य अभियान हे विद्यार्थी दरवर्षी जोपासतात. चांगल्या शिक्षणाबरोबर चांगले आरोग्य जपत महाराष्ट्राच्या ऐक्याची परंपरा या विद्यार्थ्यांनी पुढे न्यावी असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. जयश्री ताई थोरात म्हणाल्या की, अमृतवाहिनी मॉडेल स्कूलचा हा स्तुत्य उपक्रम असून दिंडी मधील विठ्ठल, रखुमाई, संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, तुकाराम, सोपान, चोखामेळा हे सामाजिक एकतेचा संदेश देतात. यशोधन कार्यालयाच्या प्रांगणात या विद्यार्थ्यांनी पायी दिंडी सोहळ्याचे सुंदर रिंगर करून पर्यावरण संवर्धनाची गीते गायली.
दरम्यान यावेळी प्राचार्य आशिष कुमार, यशोधनचे मुख्याधिकारी डॉ. नितीन भांड, श्रीमती शोभा हजारे, घुलेवाडीच्या सरपंच सौ. निर्मला राऊत, चंद्रकांत क्षीरसागर, ऋतिक राऊत यांच्यासह घुलेवाडी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, नामदेव कहांडळ, तुषार गवांदे, अविनाश आव्हाड आदींसह सर्व शिक्षक व कार्यकर्ते उपस्थित होते.
सुदर्शन निवासस्थानी बालगोपाळाचा मेळा..
वारकरी संप्रदायाचे पाईक असलेले महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सुदर्शन निवासस्थानी आज चिमुकल्या वारकऱ्यांचा मेळा झाला. यामध्ये विठ्ठल, रखुमाई, संत तुकाराम, ज्ञानेश्वर यांचा सर्व वारकऱ्यांनी सुंदर अभंग गात फुगडी खेळत दिंडीचा आनंद घेतला. या सर्व बालगोपाळ विद्यार्थ्याचे सौ. कांचनताई थोरात व डॉ. जयश्रीताई थोरात यांनी स्वागत केले.