आमदार अमोल खताळ आई समवेत झाले माऊलींच्या दिंडीत सहभागी
◻️ मुंबईतील पावसाळी अधिवेशनातून थेट आमदार खताळ थेट पंढरीत दाखल
संगमनेर LIVE | मुंबई येथील पावसाळी अधिवेशन संपून आमदार अमोल खताळ थेट पंढरीत दाखल झाले. त्यांनी काही काळ आपल्या आईसोबत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत सहभागी होत गळ्यामध्ये टाळ घालून विठ्ठल नामाच्या भक्तीरसामध्ये तल्लीन झाले होते. प्रत्यक्ष आपल्या माऊलीचे दर्शन झाले स्वतः आपल्या माऊली व वारकरी यांच्यासोबत काही अंतर चालत येत सोहळ्याचा आगळावेगळा आनंद घेतला
आषाढी एकादशीच्या निमित्त संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक संतांच्या पालख्या व दिंड्या मजल दर मजल करत विठ्ठल नामाचा जयजयकार करत पंढरपुरात दाखल झाल्या विठ्ठल नामाच्या गजराने पंढरी नगरी दुमदुमून गेली होती. वारी ही श्रद्धेचा अथांग सागर असतो, पण आईसोबत चाललेली वारी म्हणजे आशीर्वादाचे अमूल्य रूप, असे भावनिक शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. टाळ, वीणा आणि मुखी हरिनामाच्या जयघोषात हजारो भाविकां सोबत चालताना त्यांनी विविध संत आश्रमांना भेटी दिल्या.
पंढरीत दाखल झालेल्या अगस्ती ऋषी महाराज, सरला बेटातील महंत रामगिरी महाराज, देवगडच्या भास्करगिरी महाराज व प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या मठांत जाऊन संतांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.
पंढरीच्या आषाढी वारीत संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या समवेत नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठल लंघे, यांचे सहकारी, सेवेकरी व हजारो भाविक सहभागी झाले होते. संपूर्ण वारीदरम्यान 'राम कृष्ण हरी'च्या गजरात न्हालेला हा भक्तिरसाचा प्रवास अमोल खताळ यांच्यासाठी कायम स्मरणात राहणारा ठरला.