वारकरी संप्रदायाच्या विचारात देश बदलवण्याची ताकद - बाळासाहेब थोरात
◻️ एकदा तरी वारी अनुभवावी ; माजी मंत्री थोरात यांचे आवाहन
◻️ सर्व संतांचे विचार भारतीय राज्यघटनेमध्ये
संगमनेर LIVE | पायी दिंडी सोहळा ही महाराष्ट्राची समृद्ध परंपरा असून डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील ५०० युवकांनी या दिंडीमध्ये सहभाग घेऊन वारकऱ्यांची सेवा केली. पंढरपूर आलेल्या या सर्व युवकांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा तुळशीहार देऊन सत्कार केला. सर्व संतांचे विचार हे राज्यघटनेमध्ये असून वारकरी संप्रदायाच्या विचारात देश बदलण्याची ताकद असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर तालुक्यातील वारीमध्ये सहभागी झालेल्या युवकांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा सत्कार केला यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले, इंद्रजीत थोरात, शंकर खेमनर, डॉ जयश्रीताई थोरात, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, मिलिंद कानवडे, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, सोमेश्वर दिवटे, सौ. अर्चना बालोडे, सुभाष सांगळे, विश्वासराव मुर्तडक, नवनाथ आरगडे यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते. यावेळी या युवकांनी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती फोटो फ्रेम व तुळशीहार देऊन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाराष्ट्राला वारीची शेकडो वर्षांची मोठी समृद्ध परंपरा आहे. वारीमध्ये सर्वजण भेदभाव विसरून एकत्र येतात. हा मोठा भावनिक आनंद असतो. जीवनामध्ये एकदा तरी वारी अनुभवावी. शेकडो वर्षाची परंपरा संत महंतांनी सांगितलेले समितीचे विचार तरुणांनी जोपासले पाहिजे. हे सर्व समतेचे आणि मानवता धर्माचे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये उतरवले आहे.
कट्टरता वाद हा देशासाठी व मानवतेसाठी अत्यंत धोकादायक असून मानवतेचाच धर्म पुढे नेला पाहिजे. शतकानू शतकांची ही परंपरा असून वारीमध्ये मोठे महात्म आहे. लाखो लोक एकत्र येतात ताण - तणाव विसरून आनंदी जीवन जगतात. समतेचा आणि सर्व धर्म समभावाचा विचार घेऊन तरुणांनी काम करावे. संतांचा विचार असलेल्या वारकरी संप्रदायामध्ये देश बदलण्याची ताकद आहे.
मात्र काही लोक धार्मिक कट्टरवाद निर्माण करत असून यामधून तरुणांची मने भरकटवली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विष कालवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातून कोणतेही भले होणार नाही. भावनेच्या आहारी न जाता प्रत्येकाने सत्य ओळखले पाहिजे. सध्या अत्यंत सोप्या पद्धतीचे जाती - धर्माचे राजकारण केले जात आहे. मने भडकवली जात आहे. काहीजण आता वारीवर टीका करतात हे कुठले राजकारण म्हणायचे असा सवालही त्यांनी केला. यावेळी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व वारकरी आणि नागरिकांना त्यांनी आषाढी वारीच्या शुभेच्छा दिल्या.
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, वारीचा अनुभव हा अविस्मरणीय होता. तरुणांनी या वारीमध्ये अत्यंत उत्साहाने सक्रियपणे सेवा केली. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अनेक माणसे भेटतात माऊली या एका शब्दाने सर्वजण बांधले जातात. हा समतेचा विचार आहे मानवतेचा विचार आहे हाच विचार घेऊन तरुणांनी काम केले पाहिजे. कारण ती आपली समृद्ध परंपरा आहे. संगमनेर तालुका हा संत महात्मे आणि वारकरी संप्रदायाला मानणारा असल्याचे हि त्या म्हणाल्या.
यावेळी वारी मधील विविध युवकांनी आपले अनुभव सांगितले. जय हरी माऊली च्या घोषामध्ये तरुणांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात डॉ. जयश्री थोरात यांचा सत्कार केला.