जिल्ह्यात जादुटोणा विरोधी कायद्याची जागृती सर्वदूर करा - जिल्हाधिकारी
◻️ जिल्हास्तरीय जादुटोणा विरोधी जनजागृती, प्रचार व प्रसार समितीची बैठक संपन्न
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | जादुटोणा, अंधश्रद्धा व अघोरी प्रथा या समाजाच्या प्रगतीस अडथळा ठरतात. त्यांचे उच्चाटन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यासाठी जिल्ह्यात सर्वदूर जनजागृती करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केल्या.
जिल्हास्तरीय जादुटोणा विरोधी जनजागृती, प्रचार व प्रसार समितीची बैठक आज जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण प्रविण कोरगंटीवार, उपविभागीय पोलीस अधिकारी वैभव कलबुर्गे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. आशिया म्हणाले, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व त्याचे समूळ उच्चाटन होण्यासाठी अधिनियम २०१३ जारी करण्यात आला आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी समितीच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालयांत व्याख्याने व कार्यक्रमांचे आयोजन करावे. तसेच ग्रामीण भागातही या कायद्याबाबत प्रभावीपणे जागृती व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न करावेत.