स्वातंत्र्यवीराच्यां स्मृतींना उजाळा देण्याचा दिवस - आमदार अमोल खताळ
◻️ धांदरफळ येथील बी. जे. खताळ विद्यालयात आमदार खताळ यांच्या हस्ते ध्वजारोहण
संगमनेर LIVE | स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व फक्त ध्वजा रोहनापुरते न राहता ज्या महापुरुषांनी ब्रिटिशांबरोबर लढून आपल्या देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवुन दिले. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील बी. जे. खताळ जनता विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आमदार अमोल खताळ यांनी ध्वजारोहण केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी अॅड. विजय खताळ होते. ज्येष्ठ व्यक्तिमत्व मुरलीधर खताळ, सरपंच लता खताळ, अनिल खताळ, मिलिंद खताळ यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ पुढे म्हणाले की, शाळेतील मुलांमध्ये देशभक्ती जागृत करण्याचे काम स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी होत आहे. त्यांनी आपल्या देशाप्रती व्यक्त केलेल्या भावनांमधून त्यांचा आत्मविश्वास अधिकच दृढ झाला आहे. निश्चितच देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान देत क्रांतीच्या मार्गाने लढा देत स्वातंत्र्य मिळून दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धडाकेबाज निर्णय घेत असून भारतीय जवानांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम करत आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाले असले तरी अजूनही देशांतर्गत कुरघुड्या चालू आहेत. तुम्हाला आम्हाला देशप्रेमी म्हणून देशभक्त म्हणून पुढे यावा लागेल. आत्ताच काही दिवसांपूर्वी पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून भारतीय पर्यटकांवर हल्ला झाला. त्या हल्ल्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जशास तसे चोख उत्तर दिल्याचे सांगितले.
यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी संचलन करून आमदार खताळ यांना सलामी दिली. तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यानी देशभक्तीपर गीते सादर करून ग्रामस्थांचे मने जिंकून घेतली. याप्रसंगी आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा सन्मान करण्यात आला.