महिलांच्या उन्नतीसाठी विखे पाटील परिवार कायम तुमच्या सोबत - धनश्रीताई विखे
◻️ ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था आणि जनसेवा फौंडेशनच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप
संगमनेर LIVE (लोणी) | महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून केवळ बचतच न करता स्वतःचा रोजगार निर्माण करावा. यासाठी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा महिलांनी लाभ घ्यावा. तसेच प्रशिक्षणाबरोबरच महिलांच्या उन्नतीसाठी जनसेवा फाउंडेशन आणि विखे पाटील परिवार कायमच आपल्या सोबत आहे. असे प्रतिपादन रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी केले.
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अहिल्यानगर, जनसेवा फौडेशन, लोणी आणि उमेद अभियान यांच्या सहकार्याने आयोजित ज्यूट बॅग प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सौ. धनश्रीताई विखे पाटील बोलत होत्या. यावेळी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक आर. जी. देशमुख, कृषी विज्ञान केंद्राच्या गृह विज्ञान विभागाच्या प्रमुख सौ. संज्जला लांडगे, कृषी विस्तार विभागाच्या प्रमुख डॉ. प्रियंका खर्डे, सौ. निता कांदळकर आदींसह प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.
यावेळी महिलांशी संवाद साधतांना सौ. धनश्रीताई विखे पाटील म्हणाल्या, जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील आणि विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून महिला बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण होऊन त्या सक्षम व्हाव्यात यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. या माध्यमातून त्यांना विविध प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जनसेवा फाउंडेशनच्या वतीने प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या गरजेनुसार प्रशिक्षण या ठिकाणी उपलब्ध होत आहे. यांचा लाभ महिलांनी घेत असतानाच प्रशिक्षणातून मिळालेल्या माहितीतून व्यवसाय करतांना आपण एकत्रित व्यावसाय करावा. वेळोवेळी येणाऱ्या अडचणींसाठी जनसेवा फाउंडेशन आणि विखे पाटील परिवार हा कायमच आपल्या सोबत आहे असे सांगत अनुभवातून पुढे जा. नावीन्यपूर्ण प्रशिक्षण घेऊन नाविन्यपूर्ण व्यावसाय करा असेही सौ. विखे पाटील यांनी सांगितले.
प्रारंभी सौ. संज्जला लांडगे यांनी जनसेवा फौडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत असतानाच महिलांना लागणाऱ्या सर्व प्रकारचे प्रशिक्षण जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध आहे. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून टाकाऊ पासून टिकाऊ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना पुढे घेऊन जात असतांना महिलांना स्वयंपूर्ण कसे करता येईल यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान यावेळी प्रशिक्षिका सौ. कल्पना पवार प्रशिक्षणार्थीच्या वतीने सौ. सुशीला तुपे, सौ. प्रियांका कडू यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार आभार डॉ. प्रियंका खर्डे यांनी मानले.