आश्वी सह पंचक्रोशीतील गावांना परतीच्या पावसाने झोडपले
◻️ सोमवारच्या आठवडे बाजारात दाणादाण; जनजीवन विस्कळित
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी व परिसरातील गावांना रविवारी आणि सोमवारी परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामुळे सोमवारी असलेला आश्वी बु।। येथील आठवडे बाजारची दाणादाण उडाली. तर, दुसरीकडे शेती पिकांसह चारा पिके देखील पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
तालुक्यातील पुर्व भागातील गावांनमध्ये मोठ्या विश्रांतीनंतर रविवारी आणि सोमवारी परतीच्या पावसाने आश्वी बु।।, आश्वी खुर्द, उंबरी बाळापूर, ओझर बु।।, ओझर खुर्द, दाढ बु।।, दाढ खुर्द, शिबलापूर, पानोडी, पिंप्री लौकी, अजमपुर, वरवंडी, प्रतापपूर, निमगाजाळी, चिंचपूर, चणेगाव, औरंगपुर, सादतपुर, जोर्वे, कनोली, मनोली, निबांळे, कनकापूर, रहिमपूर आदि पंचक्रोशीतील गावांना चांगलेच झोडपून काढले.
सोमवारी आश्वी बु।। येथील आठवडे बाजार होता. सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास अचानक चारही बाजुने ढग जमा होऊन काळाकुट्ट अंधार निर्माण झाला. विजेच्या लख-लखाट आणि ढगांचा प्रचंड गड-गडाटात आलेल्या परतीच्या पावसाने बाजारकरुची चांगली दाणादाण उडवून दिली. यावेळी शेतीमाल विक्रीसाठी घेऊन आलेले परिसरातील शेतकरी, लहान मोठे व्यापारी यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. तर, जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी शेती पिके आडवी झाल्यामुळे हाता तोंडाशी आलेली बाजरी, कांदा, सोयाबीन, कापूस, मका आदिसह चारा पिकांचे मोठे नुकसान झाले.
दरम्यान या धुवांधार पावसामुळे मात्र, परीसरातील ओढे - नाले तुडुंब भरून वाहते झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे जनजीवन पुर्णपणे विस्कळित झाले असून दुध उत्पादकाना जनावरांना चारा काढण्यासाठी मोठ्या कष्टांचा सामना करावा लागत आहे. तर, दुसरीकडे उभ्या पिकात साचलेले पाणी कोठे काढून द्यायचे असा मोठा प्रश्न आ वासून उभा आहे.