“बाकी सारे सोडा, शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा” - बाळासाहेब थोरात
◻️मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची माजी मंत्री थोरात यांच्याकडून पाहणी
संगमनेर LIVE | कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली असून “आता बाकी सारे सोडा पहिले शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा” असे आवाहन राज्य सरकारला केले.
मराठवाड्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात ढोरकिन तसेच टाकळी फाटा येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची थोरात यांनी पाहणी केली. यावेळी समवेत खासदार कल्याण काळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण डोणगावकर, इसुफ शेख, रवींद्र काळे, विनोद तांबे, भाऊसाहेब जगताप, अशोक डोळस, रावसाहेब नाडे, संभाजी काटे, रवींद्र आमले आदि सह विविध पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या आठवड्यात मराठवाड्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे घर तसेच कुटुंबातील सामानांची वाताहात झाली आहे. कुटुंब उघड्यावर पडले आहे. पावसाने हाहाकार उडाला आहे. मात्र शासन कुठल्याही ठोस उपाययोजना करत नाही. बिहार येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या बैठकीसाठी उपस्थित राहून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी थेट मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, झालेल्या अतिवृष्टीने नुसती शेती खचलेली नाही तर महाराष्ट्र खचला आहे. शेतकऱ्यांपुढेही मोठे भयानक संकट आहे. अनेक ठिकाणी पूर्ण पिके पाण्याखाली गेली तर काही ठिकाणी जमीन सुद्धा वाहून गेली आहे. अनेकांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यामुळे शासनाने आता कुठलेही कागदी घोडे न नाचवता सर्व नियम व अटी टाळून तातडीने मदत केली पाहिजे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही सरकारची पहिली भूमिका असली पाहिजे मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. अनेक जाचक अटी टाकल्या जात आहेत. आता बाकी सारे सोडा पहिले शेतकऱ्यांना मदत करा. पंचनामे गती द्या याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारकडे केली आहे.
खासदार कल्याण काळे म्हणाले की, मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. सत्ताधारी येऊन फोटोसेशन करत आहे. मात्र, कुठलीही ठोस मदत जाहीर करत नाही अत्यंत दुर्दैवी आहे. या सरकारला फक्त राजकारण करायचे आहे. शेतकऱ्यांशी काही घेणे देणे नाही अशी टीकाही त्यांनी केली.
लोकनेते बाळासाहेब थोरात हे बांधावर येऊन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत असताना आपला नेता आपल्यासाठी आल्याने अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. यावेळी सर्व शेतकऱ्यांनी खंबीर राहा. आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगत बाळासाहेब थोरात यांनी सर्व शेतकरी व नागरिकांना धीर दिला.