आश्वी येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला १९ हजारांचा ऑनलाईन गंडा
◻️ आश्वीसह पंचक्रोशीतील गावांतील नागरीकांची लाखों रुपयांची फसवणूक
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरात मागील तीन महिन्यांपासून ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये ग्राहक सेवा केंद्र चालक, मेडिकल व्यवसायिक, शेतकरी आणि आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला ऑनलाईन गंडा घातल्यामुळे खळबळ उडाली आहे.
नुकतीच तालुक्यातील आश्वी खुर्द येथील एक धक्कादायक घटना उघडकीस आली. गावातील एका ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला भाडेकरू बोलत असल्याचे भासवून तब्बल १९ हजार रुपये लुबाडून ऑनलाईन गंडा घातला आहे. त्यामुळे मागील तीन महिन्यात आश्वीसह पंचक्रोशीतील गावांतील नागरीकांची लाखों रुपयांची फसवणूक झाल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे फसवणूक झालेल्या व्यक्ती या सुशिक्षित आणि समाजात वावरणाऱ्या असल्यामुळे त्या फसवणूकीला बळी पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शनिवारी दुपारी एक सेवानिवृत्त कर्मचारी घरी जेवण करत होते. त्यावेळी त्यांना एक फोन आला “हॅलो, मी तुमचा भाडेकरू बोलतोय. माझा फोन-पे नंबर बंद असून माझा मित्र हॉस्पिटलमध्ये आहे. त्याला तातडीने १९ हजार रुपये लागतील. तुम्ही लगेच त्याला पाठवा, मी दहा मिनिटांत तुम्हाला परत करतो.” (संभाषण हिंदीतून होते) असा फोन आला.
दवाखान्याचे करणं ऐकल्यामुळे ज्येष्ठ व्यक्तींने तात्काळ ५ हजार रुपये तीनदा पाठवून एकूण १५ हजार ट्रान्सफर केले. त्यानंतर पुन्हा फसवणूक करणाऱ्याने क्यूआर कोड पाठवून आणखी रक्कम पाठवण्यास सांगितले. यानंतर दोनदा २ हजार रुपये पाठवले मात्र, तिसऱ्यांदा पैसे अडकले. त्यावेळी खात्यातील शिल्लक तपासल्यानंतर फसवणूक झाल्याचे ज्येष्ठ व्यक्तींच्या लक्षात आले.
दरम्यान फसवणुकीनंतर त्या व्यक्तीने व्हॉट्सअप मेसेजेस डिलीट करत फोन बंद केला. या घटनेनंतर फसवणूक झालेल्या व्यक्तीने आश्वी पोलीस ठाण्यात गाठत हकीगत सांगितली. त्यानंतर पोलीसांच्या सूचनेनुसार सायबर क्राईमच्या ऑनलाईन पोर्टलवर तक्रार नोंदवण्यात आली आहे.
या पुर्वी देखील “आश्वी पोलीस स्टेशन मधुन पीएसआय राऊत बोलतोय” आणि त्यानंतर “मी आश्वी आरोग्य केंद्रातुन डाॅक्टर सोमाणी बोलतेय” अशा घटना बरोबरचं स्टेट बँकेचे नाव घेऊन क्रेडीट कार्ड बील थकल्याच्या नावाखाली दंडाची भिती दाखवुन गंडा घालण्यात आला होता. त्यामुळे नागरीकांनी खात्री केल्याशिवाय कोणतेही ऑनलाईन व्यवहार करु नये. अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सर्वानी खबरदारी घ्यावी!