तुळजापुरात घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ

संगमनेर Live
0
तुळजापुरात घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ

◻️ छत्रपती शिवरायांनी देवीला अर्पण केलेल्या जमिनीतील मातीला अनन्यसाधारण महत्त्व 

◻️ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते “आई राजा उदो-उदो” च्या जयघोषात घटस्थापना 

संगमनेर LIVE (तुळजापुर) | महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आज सोमवार, अश्‍विन शुक्ल प्रतिपदेला धार्मिक उत्साह व भक्तिभावाच्या वातावरणात प्रारंभ झाला. पहाटे मंदिरात पारंपरिक पद्धतीने श्री तुळजाभवानी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली.

दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते मंत्रोच्चार, पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि "आई राजा उदो-उदो" च्या जयघोषात घटस्थापना विधी पार पडला.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र महोत्सवात सहभागी होण्यासाठी तुळजापूर नगरीत महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातून हजारो भाविक दाखल झाले आहेत. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला.

भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासन, पोलीस विभाग, नगरपरिषद, महसूल प्रशासन तसेच आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा व राज्य परिवहन महामंडळ या विभागांकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आरोग्य सेवा केंद्रे, वाहतूक व्यवस्था आणि स्वच्छता याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.

घटस्थापना सोहळ्याला आमदार तथा विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, सौमय्याश्री पुजार, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, मंदिर संस्थानच्या तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, महंत बजाजी बुवा, महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, विपिन शिंदे, अनंत कोंडो यांच्यासह पुजारी बांधव व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घटस्थापनेचे महत्व..

घट बसविण्याची जागा ही सिंहाच्या गाभाऱ्यात देवींच्या डाव्या बाजूला असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री तुळजाभवानी देवीला अर्पण केलेल्या जमिनीतील माती घटस्थापनेकरिता आणली जाते. त्या मातीला 'वावरी' असेही म्हणतात. प्रथेप्रमाणे धाकटे तुळजापुरातील कुंभार कुटुंबीयांकडून कलश येतो. या कलशामध्ये गोमुख व कल्लोळ तीर्थाचे पाणी भरलेले असते. जिल्हाधिकारी व पुजाऱ्यांच्या उपस्थितीत गोमुख तीर्थाजवळ गंगा आवाहन केले जाते. त्यानंतर वाजत गाजत घट कलश सिंहाच्या गाभाऱ्यात आणून प्रतिष्ठापित केला जातो.

तसेच तुळजापुरातील शेटे कुटुंबीयांकडून सप्तधान्य (जवस, करडई, मूग, ज्वारी, गहू, मका व सातू) दिले जाते. घटाची स्थापना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते केली जाते. देवींची पहिली माळ जी नागवेलीच्या पानांची असते, ती माळ घटा वर अर्पण केली जाते. घटस्थापनेनंतर मंदिर संस्थानच्या वतीने ब्राह्मणास पाठ, हवन व अनुष्ठानासाठी वर्णी दिली जाते.

नवरात्र महोत्सवाचे स्वरूप..

पुढील नऊ दिवस तुळजापूर नगरीत भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळणार असून, धार्मिक विधींसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देवीभक्तांसाठी हा उत्सव अध्यात्म, श्रद्धा आणि संस्कृती यांचा अनोखा संगम ठरणार आहे.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !