गुणवत्तापूर्ण दूध व उपपदार्थ हे राजहंसचे वैशिष्ट्य - बाळासाहेब थोरात
◻️ तालुक्याची अर्थव्यवस्था समृद्ध करण्यात दूध व्यवसायाचा मोठा वाटा
◻️ राजहंस दूध संघाची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
संगमनेर LIVE | दुष्काळी तालुका ते प्रगतशील तालुका या वाटचालीमध्ये दूध व्यवसायाच्या मोठा वाटा असून तालुक्यात दररोज नऊ लाख लिटर दूध उत्पादन होत आहे. या व्यवसायाने शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. दूध व्यवसाय सहकार व ग्रामीण अर्थव्यवस्थेमुळे बाजारपेठ फुलली असून या समृद्धीचा पाया शेतकरी व उत्पादक आहे. तालुक्याची समाज व्यवस्था चांगली ठेवण्यासाठी प्रत्येकाने जागृत राहा असे आवाहन करताना गुणवत्तापूर्ण दूध व उपपदार्थ हे राजहंस दूध संघाचे वैशिष्ट्य राहिले असल्याचे गौरवोद्गार लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी काढले. तर, यावर्षी दिवाळी गोड करणार असल्याचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी म्हटले आहे.
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, बाजीराव खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, सौ. दुर्गाताई तांबे, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, पांडुरंग घुले, शंकरराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, लहानु गुंजाळ, आर. बी. राहणे, इंद्रजीत थोरात, अजय फटांगरे, व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, रामहरी कातोरे, के. के. थोरात, गणपतराव सांगळे, रामदास वाघ, सुभाष आहेर, सुनील कडलग, अविनाश सोनवणे, शेळी मेंढी पालन संघाचे डॉ. गंगाधर चव्हाण, दूध संघाचे संचालक, विलास वर्पे, भास्करराव सिनारे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबनराव कुऱ्हाडे, बादशहा वाळुंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, सौ. प्रतिभा जोंधळे, भारत मुंगसे, डॉ. प्रमोद पावसे, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, फायनान्स मॅनेजर गणपत शिंदे आदी उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, दूध संघाची ५० वर्षाकडे होणारी वाटचाल ही मोठी कौतुकास्पद आहे. दूध व्यवसाय अत्यंत कष्टाचा व मेहनतीचा आहे. आपल्या तालुक्यातील नागरिक कष्टाळू आहेत. आज तालुक्यातून नऊ लाख लिटर दूध उत्पादन होत आहे. गुणवत्ता हे तालुक्याचे वैशिष्ट्य राहिली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दूध व्यवसायाचा तालुक्यात पाया घातला आणि अर्थव्यवस्था सक्षम करण्यात या व्यवसायाने मोठा वाटा उचलला. गुणवत्ता पूर्ण दूध आणि उपपदार्थ हे वैशिष्ट्य राहिले आहे. कारण दूध हे लेकरा बाळांच्या मुखात जात असते. आणि ही काळजी आपल्या तालुक्यात घेतली जाते.
सहकारी दूध संघामुळे खाजगी संघांवर अंकुश आहे. त्यांना मनमानी करता येत नाही. असे असतानाही सहकारी दूध संघांना अनेक निर्बध आहेत ते खाजगी संघांना नाही. अनेक ठिकाणी आता पनीर बनावट पद्धतीने तयार केले जात आहे. पनीर तयार करण्यासाठी कमीत कमी ३०० रुपये प्रति किलो खर्च येतो मग १५० रुपये किलो मध्ये मिळणारा पनीर कसा असेल याची प्रत्येकांनी खातरजमा करून घ्या. दुधामध्ये बिटवेल, विटामिन, कॅल्शियम असून दूध शरीराला आवश्यकच आहे. त्यामुळे मुलाबाळांना दूध दिले पाहिजे.
भाकड गाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तो सरकारने सोडवला पाहिजे. आगामी काळामध्ये कमी गाईमध्ये जास्त दूध उत्पादन याकरता काम करावे लागणार आहे.
तालुक्याची वाटचाल मोठी कौतुकास्पद राहिली आहे. सहकाराला कवच होते. परंतु मागील एक वर्षापासून तालुक्यात वातावरण बदलले आहे. खोट्या केसेस टाकल्या जात आहेत. दररोज अटकपूर्व जामीन घ्यावा लागत आहे. निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले मात्र, अनेक जलदूत आता पुढे यायला सुरुवात झाली आहे. आज इतरांना त्रास आहे उद्या तुम्हालाही होईल. ज्यांचा संबंध नाही त्यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणून हे सर्व थांबवण्यासाठी तसेच तालुक्याची समाज व्यवस्था चांगली ठेवण्यासाठी जागृत रहा असे आवाहन करताना शेतकरी उत्पादक हा तालुक्याच्या विकासाचा पाया आहे. सहकारामुळे बाजारपेठ समृद्ध आहे असे सांगताना तालुका जपण्यासाठी आता प्रत्येकाने आत्मपरीक्षण करा असे आवाहन त्यांनी केले.
आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दूध संघाची व इतर सहकारी संस्थांची वाटचाल दिशादर्शक आहे. दिवसेंदिवस या सहकारी संस्था पुढील प्रश्न बदलत चालले आहे. दूध व्यवसायामध्ये अस्थिरता आहे. तरीही राजहंस दूध संघ हा राज्यात प्रथम क्रमांकाचा असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दूध पोचवले जात आहे. या यशामध्ये सर्वाचा सहभाग असल्याचे ते म्हणाले.
रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, यावर्षी दूध संघाने १२ कोटी ५१ लाख लिटर दुधाचे संकलन केले असून शेतकऱ्यांकडून ४०४ कोटींचे दूध खरेदी केले आहे. दूध संघाची आर्थिक उलाढाल ही ५५१ कोटींची झाली असून यामुळे तालुक्याच्या आर्थिक विकासात मोठ्या सहभाग नोंदवला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली दूध संघ व इतर सहकारी संस्था देशासाठी दिशादर्शक ठरत आहे. दूध संघाने एमडीएफ गोठा, मुरघास असे प्रकल्प राबविले असून त्यांचे राज्यात अनुकरण केले जात आहे. दूध संघामध्ये यावर्षी सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा मानस असून मिशन ५० लिटर अंतर्गत दूध उत्पादक गाई वाढवण्यासाठी काम केले जात आहे.
गोहत्या बंदीमुळे भाकड जनावरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण अशी भाकड जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना अवघड जात आहे. त्यामुळे सरकारने याबाबत तातडीने पर्याय व्यवस्था करावी. अशी मागणी करताना शेतकरी व दूध उत्पादकांच्या विविध अडचणी असून सरकारने त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.
दरम्यान या सभेचे स्वागत व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर यांनी केले. प्रास्ताविक चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी केले. नोटीस वाचन कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ व सुरेश जोंधळे यांनी केले तर संतोष मांडेकर यांनी आभार मानले.
दूध उत्पादकांची दिवाळी गोड होणार..
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाने कायम शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. गुणवत्तेबरोबर स्पर्धेमध्ये कायम अग्रक्रम राखताना दूध उत्पादकांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. आगामी काळात प्रत्येक दूध सोसायट्यांना सोलर प्रकल्पासाठी मदत करणार असून येणारी दिवाळी गोड करणार असल्याचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी सांगितले.