प्रवरा सांस्कृतिक महोत्सवात विद्यार्थ्याकडून कला - गुणांचा अविष्कार!
◻️ दोनशे शाळेतील ३ हजारांहून अधिक विद्यार्थी झाले होते सहभागी
संगमनेर LIVE (लोणी) | स्त्री भृण हत्या, प्रदूषण, व्यसनमुक्ती, प्लास्टिक मुक्ती, सहकारातून समृद्धीकडे, चला आत्मनिर्भर होऊ या, शिक्षणांतून समृध्दीकडे, स्री- पुरुष समानता, मोबाईल वापर जनजागृती, पर्यावरण, शेतकरी व्यथा, स्वच्छ भारत अभियान, सहकार, देशभक्ती, पोवाडा, कोळीगीत, भावगीत, गवळण यासह ऑपरेशन सिंदूर अशा विविध कला गुणांचा संगम, सोबत कार्यक्रमाबरोबरचं विविध बक्षीसांची लयलुट करत हजारो प्रेक्षक प्रवरा सांस्कृतिक महोत्सवास सहभागी झाले होते.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये पारंपारिक वाद्यासह ढोल, ताशा, लेझीम आणि वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्याच्या उपस्थित मोठ्या जल्लोषात गणरायाचे आगमन झाले. यावर्षी थिंक ग्लोबली ॲक्ट लोकली ही संकल्पना घेऊन संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा शैक्षणिक समूहाच्या डीजे मुक्त श्री गणेश उत्सव हा उपक्रम सुरू करण्यात आला.
या माध्यमातून प्रत्येक शाळा महाविद्यालयात ढोल, ताशा, लेझीम यासह विविध वेशभूषा यांच्या माध्यमातून श्री गणेश मूर्तीचे आगमन आणि श्रींची विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याची ओळख जनतेला व्हावी या उद्देशाने सहकारातून समृद्धीकडे शिक्षणातून विकासाकडे त्याचबरोबर पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सुरू केलेल्या थिंक ग्लोबली ॲक्ट लोकली ही संकल्पना घेऊन यावर्षीचा गणेश उत्सव साजरा होत आहे.
प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये पर्यावरण पूरक शाडू मूर्तीची कार्यशाळा, प्रवरा सांस्कृतिक महोत्सवा अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा, राहाता, प्रवरानगर, सात्रळ, आश्वी, लोणी आणि कोल्हार या ठिकाणी परिसरांतील प्राथमिक शाळा, महाविद्यालयांचा सांस्कृतिक कार्यक्रम हा प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी ठरली.
या वर्षी देखील सहा ठिकाणी प्रवरा सांस्कृतिक महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रवरा शैक्षणिक संकुलातील विविध शाळा महाविद्यालयांसह परिसरातील दोनशेहून अधिक शाळा महाविद्यालयातील जवळपास तीन हजार नवोदित कलाकारांनी आपल्या आपल्याकडे असलेल्या विविध कला कौशल्याच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. प्रवरेच्या प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार, कृषी, ग्रामीण विकास त्याचबरोबर अध्यात्मातून केलेले काम विद्यार्थ्यासह ग्रामस्थांपर्यंत पोहोचावे यासाठी त्यांच्या कार्याचा जीवनपटवर आधारित देखावे, व्याख्याने, रांगोळी स्पर्धा, पोस्टर प्रदर्शन, चित्रफित यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन प्रत्येक शाळा महाविद्यालयात करण्यात आले होते. यास सर्वानी भरभरुन प्रतिसाद दिला.
शिक्षणाबरोबरच विविध संस्कृतीचे ज्ञान विद्यार्थ्याना व्हावे परिसराची जडणघडण नव्या पिढीला माहीत व्हावी. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रवरेच्या शैक्षणिक संकुलामार्फत विविध उपक्रम हे सुरू असतात. श्री गणेश उत्सवाबरोबरच, नवरात्र उत्सव, गड किल्यांची ओळख आणि इतिहास, शाळांच्या वार्षिक संम्मेलनांतून देशाच्या परंपरेची ओळख ही विद्यार्थ्याना करून दिली जाते.
शिक्षक, पालक विद्यार्थी याचा त्रिवेणी संगम साधत आषाढी वारीचा उपक्रमातून भव्य दिव्य असा दिंडी सोहळा, त्याचबरोबर मागील वर्षी संपन्न झालेली श्रींची विसर्जन मिरवणूक ही विश्वविक्रम करणारी ठरली. प्रवरेचा विद्यार्थी हा शिक्षणाबरोबरच विविध कौशल्यातून पुढे जावा हाच प्रवरेचा मानस राहिला आहे. म्हणूनच विविध उपक्रमाच्या माध्यमातून एक सक्षम विद्यार्थी घडवण्याचे काम प्रवरा ही करत आहे. अशी भावना डाॅ. सुस्मिता विखे पाटील यांनी व्यक्त केली.
सहकारातून समृद्धीकडे शिक्षणातून विकासाकडे ही संकल्पना घेऊन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये होणाऱ्या विविध उपक्रमामध्ये प्रवरेच्या शाळा महाविद्यालयांबरोबरच परिसरातील विविध प्राथमिक शाळा, विविध खाजगी शाळा यांचाही सहभाग प्रवरेतील सांस्कृतिक महोत्सव आणि विविध उपक्रमामध्ये नेहमीच असतो. या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थीच्या कलागुणांना संधी मिळावी हाच प्रयत्न प्रवरेचा आजपर्यंत राहिला आहे. यावर्षीच्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये पद्मश्री विखे पाटील मूकबधिर विद्यालय, प्राथमिक शाळा, ऊर्दू शाळेतील बाळ गोपाळ यांनी सादर केलेले कार्यक्रम हे लक्षवेधी ठरले.