मुख्यमंत्र्याच्या पाठबळामुळे मराठा समाजाला न्याय मिळवून देऊ शकलो - विखे पाटील

संगमनेर Live
0
मुख्यमंत्र्याच्या पाठबळामुळे मराठा समाजाला न्याय मिळवून देऊ शकलो - विखे पाटील 

◻️ शिर्डी विमानतळावर सकल मराठा समाजाच्या वतीने मंत्री विखे पाटील यांचे भव्य स्वागत

संगमनेर LIVE (शिर्डी) | श्री साईबाबांच्या भूमीतून श्रध्दा आणि सबुरीचा संदेश घेवूनच आपण आझाद मैदानातील आंदोलनाला सामोरे गेलो होतो. दडपण होते पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकारी मंत्र्याच्या पाठबळामुळे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा आत्मविश्वास मनात निश्चित होता. आशी भावना जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलून दाखवली.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपसमितीचे अध्यक्ष या नात्याने महत्वपूर्ण भूमिका बजावणारे मंत्री विखे पाटील यांचे शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करून अभिनंदन करण्यात आले. आमदार विठ्ठलराव लंघे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, माजी नगराध्यक्ष अभय शेळके संभाजी ब्रिगडचे दशरथ गव्हाणे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची तीव्रता जशी वाढत होती तेव्हाच  उप समीतीने बैठका घेवून जरांगे पाटलांच्या मागण्यावर सकारात्मक निर्णय होण्याच्या दृष्टीने यशस्वी प्रयत्न केले. न्यायमूर्ती शिंदे समितीला विश्वासात घेवून राज्याच्या महाधिवक्त्यांच्या मार्गदर्शनाने तयार केलेला मसूदा आंदोलकांच्या हाती ठेवला. यामधून निश्चित आंदोलकांचे समाधान होईल असा आत्मविश्वास मनामध्ये होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेला विश्वास यामुळे सार्थ करता आला. झालेल्या निर्णयामुळे मराठा समाजातील बांधवाचे स्वप्न पूर्ण करता आल्याचा आनंद खूप मोठा असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. झालेल्या निर्णयाचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघर्ष योध्दा जरांगे पाटील यांनाच असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

आंदोलकांशी चर्चा करायला जाताना दडपण जरूर होते. एकीकडे आंदोलनाची  न्यायालयात सुनावणी सुरू तर, दुसरीकडे आंदोलनकर्त्याच्या समोर जाताना आमच्याप्रती त्यांच्या मनामध्ये असलेल्या विश्वासला कुठेही तडा जाणार नाही ही भूमिका होती. चांगले काम करून मराठा बांधवाना न्याय देण्याची भूमिका यासर्व निर्णय प्रक्रीयेमागे असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

मंत्री छगन भुजबळ यांच्या नाराजीवर बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की, जेष्ठ नेते म्हणून त्यांनी यासर्व सामाजिक परिवर्तनात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सामाजिक दृष्टीकोनातून झालेल्या निर्णयाचा विचार करतील आशी अपेक्षा व्यक्त करून मराठा समाजा प्रमाणेच ओबीसी समाजाच्या प्रश्नाना न्याय देण्यासाठी महायुती सरकारने उपसमिती नेमली आहे. राज्यात सद्भावनेचे वातावरण असावे यासाठीच  सर्व पक्षांचे प्रतिनिधीत्व यामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात ओबीसी संघटनाकडून शासन निर्णयाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर प्रतिक्रीया व्यक्त करतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की, ओबीसी संघटनेचे नेते तायवडे यांनी घेतलेल्या भूमिकेचे आपण स्वागत करीत असून, मराठा समाजाबद्दल निर्णय करतांना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही हेच त्यांनी झालेल्या निर्णयानंतर बोलून दाखवले आणि  सरकारची सुध्दा हीच भूमिका असतानाही काही लोक जाणीवपुर्वक वेगवेगळी वक्तव्य करून आपली राजकीय पोळी भाजून घेत असल्याची टिका मंत्री विखे पाटील यांनी हाके यांचे नाव न घेता केली.

झालेल्या निर्णयाबद्दल सरकारची केव्हाही चर्चा करण्याची तयारी आहे. मराठा समाजातील काही नेत्यानाही या व्यासपीठावर येवून आंदोलनात आपली भूमिका मांडण्याची संधी होती. केवळ बंद खोलीतून भूमिका व्यक्त करून दिशाभूल न करण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी मराठा समाजातील नेत्यांना केले.

शिवसेनेचे खासदार मिलींद देवरा यांनी आंदोलनाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राबाबत बोलतांना विखे यांनी सांगितले की, मुंबईकरांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल मुख्यमंत्र्यांनीच दिलगीरी व्यक्त केली आहे. आंदोलनात मुंबई महापालिका पोलीस प्रशासनाचे चांगले सहकार्य मिळाले. मराठा समाजाच्या काही भावना होत्या त्यासाठी रस्त्यावर यायचे नाही तर कुठे यायचे, मराठी माणसामुळे मुंबई ठप्प झाली तर त्यात वावगे काय? असा प्रश्न मंत्री विखे पाटील यांनी केला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !