मांची फाटा येथे गतिरोधक बसविण्याची नागरीकांची मागणी
◻️ अनेकांनी गमावले प्राण तर, अनेकांना कायमस्वरूपी आले अपंगत्व
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर - लोणी - कोल्हार या राज्य महामार्गाला जोडणाऱ्या मांची फाटा येथे भरधाव वेगाने होत असलेल्या वाहतूकीमुळे दिवसेंदिवस अपघाताची संख्या वाढत आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी मांची फाटा याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक बसवावे अशी मागणी स्थानिकासह पंचक्रोशीतील नागरीकांनी केली आहे.
नाशिक, संगमनेर, लोणी, श्रीरामपूर, अहिल्यानगर अथवा इतरत्र जाण्यासाठी आश्वी बु।। ते मांची फाटा हा रस्ता पंचक्रोशीतील गावांतील नागरिकांना जवळचा आणि सोयीस्कर आहे. या रस्त्याच्या दुतर्फा लोकवस्ती सुध्दा मोठी आहे. तसेच मांचीहिल शैक्षणिक आणि औद्योगिक संकुल देखील यांचं रस्त्याने जोडले जाते. त्यामुळे शिक्षणाच्या निमित्ताने विद्यार्थी, पालक, शिक्षक व रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण, नातेवाईक यांची मोठी नियमित वर्दळ असते.
यातील अनेकजण हे संगमनेर व लोणी परिसरातून या ठिकाणी येत असतात. मात्र, मांची फाटा जोडणाऱ्या महामार्गाच्या दोन्ही बाजूने गतिरोधक नसल्यामुळे वेगावर नियंत्रण न ठेवता बेदरकारपणे वाहण चालक वाहणे चालवत असल्यामुळे वारंवार होणाऱ्या अपघातांची संख्या याठिकाणी वाढत आहे. आतापर्यत परिसरातील एक महाविद्यालयीन विद्यार्थ्यासह दोन - तीन जणानी अपघात आपले प्राण गमावलेले असून अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे.
दरम्यान नुकताचं याठिकाणी संगमनेरच्या दिशेने येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, दैव बलवत्तर त्यामुळे विद्यार्थिनी थोडक्यात बचावली. त्यामुळे पंचक्रोशीत मोठी दहशत असून मांची फाटा याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक बसवावे अशी मागणी करत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी देखील यामध्ये लक्ष घालावे. अशी विनंती स्थानिकासह पंचक्रोशीतील नागरीकांनी केली आहे.