बिंल्डीग प्रवरा विद्यार्थी एक्स्पो मध्ये १ कोटी ७० लाखांची उलाढाल!
◻️ प्रवरा शैक्षणिक संकुल उद्योजकतेला प्रोत्सहन देणार - डॉ. सुस्मिता विखे
◻️ १८० स्टॉल, ९०० विद्यार्थ्यानी नोंदवला सहभाग
संगमनेर LIVE (लोणी) | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या बिल्डिंग प्रवरा या विद्यार्थ्याच्या एक्स्पो मध्ये तब्बल १ कोटी ७० लाख रुपयांची व्यवसायाच्या माध्यमातून उलाढाल झाली.
संस्थेच्या माध्यमातून मागील दोन वर्षापासून विद्यार्थ्यामध्ये उद्योजकता वाढीस लागावी. तसेच प्रवरेचा विद्यार्थी हा नोकरी करणारा नव्हे तर नोकरी देणारा ठरावा, त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये व्यावसायिकता वाढीस लागावी. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थेचे अध्यक्ष आणि मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शाळा महाविद्यालय यांच्या वतीने दरवर्षी बिल्डिंग प्रवरा विद्यार्थी एक्स्पो आयोजित केला जातो. यावर्षी थिंक ग्लोबली अॅक्ट लोकली ही संकल्पना घेऊन या उपक्रमामध्ये ९०० विद्यार्थ्यानी १८० स्टॉलची उभारणी केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वदेशीचा वापर करूया ग्रामीण भारत समृद्ध करूया असा नारा देत विविध व्यवसायातून तब्बल १ कोटी ७० लाखाची उभारणी केली. तीन दिवस चाललेल्या ह्या एक्स्पोला विद्यार्थ्यासह परिसरातील आणि जिल्ह्यातील नागरिकांनी उदंड असा प्रतिसाद दिला. सौर ऊर्जा, टाकाऊ पासून टिकाऊ, दुग्धजन्य पदार्थ, विविध कृषी संलग्नित प्रक्रिया उद्योग, पर्यावरण संवर्धन अशा वस्तू दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हस्तकलेच्या वस्तू विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी ठेवल्या होत्या.
सोशल मीडिया बरोबरच विद्यार्थ्यानी विक्री व्यवस्थापन कौशल्य अवगत करत आपला व्यवसाय उभारतानाच या व्यवसायामध्ये असणाऱ्या अडचणी, समस्या आणि त्यावर आपण कशी मात करावी याचे प्रत्यक्ष शिक्षण कृतीतून घेतले. तीन दिवस चाललेल्या या एक्स्पोमध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असतानाच विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या त्रिसूत्रीच्या माध्यमातून ग्रामीण भागात प्रत्येक गोष्ट ही देशाच्या दृष्टीने एक मॉडेल उभे राहू शकते हा संदेश देण्याचा प्रयत्न झाला.
शेती व्यवसायामध्ये बाजार भाव ही मोठी समस्या असली तरी उद्योग व्यवसायामध्ये आपण उत्पादित केलेला शेतमाल जोपर्यत आपण थेट ग्राहकाला विकत नाही तोपर्यंत आपल्याला जास्तीचा नफा मिळत नाही हाच संदेश विद्यार्थ्यांनी या निमित्ताने दिला.
या उपक्रमाला जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डाॅ. सुजय विखे पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या विश्वस्त सुवर्णाताई विखे पाटील, पायरेन्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुप्रिया विखे पाटील यांच्यासह जिल्हाभरातील विविध पदाधिकाऱ्यांनी भेटी देत विद्यार्थ्याना प्रोत्साहन दिले.
समारोप प्रसंगी बोलतांना अनेक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल डॉ. सुस्मिता विखे पाटील यांना धन्यवाद देण्याबरोबरच हा उपक्रम आमच्यासाठी महत्त्वपूर्ण होता अनेक गोष्टी आणि अनेक कौशल्य आम्हाला या माध्यमातून मिळाले असल्याचे सांगत अनेक अनुभवही या विद्यार्थ्यानी सांगितले.
डॉ. सुस्मिता विखे पाटील म्हणाल्या, अहिल्यानगर जिल्हा हा उद्योगाचे माहेरघर व्हावे हा उद्देश मंत्री विखे पाटील यांचा आहे. त्या दृष्टीने मागील दोन वर्षापासून प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून बिल्डिंग प्रवरा हा उपक्रम सुरू आहे. मागील वर्षी या उपक्रमाच्या माध्यमातून एक कोटी रुपयाची उलाढाल विद्यार्थ्यांनी केली. यावर्षी विद्यार्थ्यांनी विविध स्टॉलच्या माध्यमातून १ कोटी ७० लाखाची उलाढाल करत एक विक्रम केला. याशिवाय जवळपास एक कोटी रुपयाच्या विविध वस्तूंची आगाऊ बुकिंग विद्यार्थ्यानी त्यांच्या कौशल्यातून केली. बिल्डिंग प्रवरा हा उपक्रम विद्यार्थ्याच्या माध्यमातून यशस्वीरित्या पूर्ण करून पुढील वर्षी या उपक्रमाची व्याप्ती वाढवणार असल्याचेही सांगितले. जिल्ह्याभरातून या उपक्रमाला विद्यार्थी पालक, शिक्षक आणि नागरीकंनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी सर्वाचे आभार मानले.
दरम्यान हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, डाॅ. उत्तमराव कदम, सौ. लिवावती सरोदे, समन्वयक डॉ. महेश खर्डे, डॉ. आर. ए. पवार, प्रा. अर्जुन आहेर, प्रा. विजय आहेर, महेद्र खर्डे आदींसह विविध शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक यांनी यांच्यासह आयोजन समितीने विशेष प्रयत्न केले.
व्यवसाय सुरु करतांना खुप भीती होती पण येथे आल्याने स्टाॅल लावल्यानतंर सर्व भीती सुरु झाली.शिक्षणांसोबत हा अनुभव खुप महत्वपुर्ण ठरला.जे पुस्तकांत नाही ते येथे शिकण्यास मिळाले. मुक-बधीर विद्यार्थ्यानी लावलेल्या स्टाॅल मधून हजारो पणत्या आणि पर्यावरणपुरक आकाश कंदिळ आणि हस्तकलेच्या वस्तूची विक्री केली. पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्याचा जीवनपट मुलांना प्रेरणादायी असाच ठरला.
मुलांना पुस्तकी ज्ञानासोबत जीवन यशस्वी होण्याठी चार भिंतीच्या पलीकडच्या ज्ञानांची गरज आहे तेच काम आज प्रवरा शैक्षणिक संकुळात डाॅ. सुस्मिता विखे पाटील करत आहे ‘सबका साथ सबका विकास’ यातून प्रवरेचे अनेक उपक्रम हे लोकाभिमुख ठरले आहेत.