अवघ्या काही तासांत डिग्रस येथे दहशत निर्माण करणारे दोन बिबटे जेरबंद
◻️ बिबट्यांचे ट्रॅकिंग व नसबंदी करण्याबाबत पाठपुरावा सुरू - आमदार अमोल खताळ
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील डिग्रस येथे शिकारीच्या शोधात झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका १४ वर्षीय शाळकरी मुलीवर अचानक हल्ला करून तिला गंभीरित्या जखमी केले होते. त्यामुळे वनविभागाने तात्काळ घटनास्थळी जाऊन योग्य त्या उपाययोजना राबवून अवघ्या काही तासांत दहशत निर्माण करणारे दोन बिबटे जेरबंद केले.
प्रगती सखाराम श्रीराम (वय - १४) ही शनिवारी सकाळी शाळेत जात बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांनी तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बिबट्याला जेरबंद करण्याचे निर्देश दिले. तसेच जखमी मुलीला लस आणि आवश्यक उपचार तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या. या घटनेची माहिती मिळताच राहुल खताळ यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी मुलीची आणि पालकांची भेट घेतली.
बिबट्याने शालेय विद्यार्थीनीवर केलेल्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा तालुक्यातील बिबट्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा आपण मांडला होता. तसेच बिबट्यांचे ट्रॅकिंग व नसबंदी करण्याबाबत पाठपुरावा केलेला आहे. त्याबाबत संगमनेर तालुक्यातील आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबट्या नसबंदीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आलेला आहे. लवकरचं याबाबत कृती करण्यासाठी वनमंत्री व सर्व प्रमुख अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेणार घेणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.