तीस वर्षात इतके मोठे पंडाल आणि भव्य आयोजन पाहिले नाही!
◻️ पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांचे गौरवोद्गार
संगमनेर LIVE (शिर्डी) | अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील अस्तगाव माता मंदिर परिसरात जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित शिवमहापुराण कथा महोत्सवाचा भव्य शुभारंभ सोमवारी भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माच्या मंगल वातावरणात झाला. कथेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांचा महासागर उपस्थित राहिला. गेल्या तीस वर्षांत इतके मोठे, सुव्यवस्थित आणि भक्तिभावाने ओथंबलेले पंडाल भव्य आयोजन मी पाहिले नाही, अशा गौरवोद्गारांसह प्रवचनकार पंडित प्रदीप मिश्रा महाराज भावूक झाले.
शिर्डी नगरीत भगवामय झळाळी पसरली होती. हर हर महादेव च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू, भक्तीभावाचा ओलावा आणि मनात शिवभक्तीची ऊर्जा दिसत होती. मिश्रा महाराजांनी शिवमहापुराणातील संदर्भ मांडत भगवान शिवाची उपासना, श्रद्धा आणि सदाचार यांचा संदेश दिला. त्यांनी शिर्डीतील आयोजन, ग्रामस्थांचा सहभाग आणि जनसेवा फाउंडेशनच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
आयोजनाचे उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि भाविकांसाठी करण्यात आलेल्या सोयी-सुविधांमुळे सर्वत्र जनसेवा फाउंडेशनचे कौतुक होत आहे. पाण्याची, भोजनाची, वाहतुकीची, तसेच सुरक्षा व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी झाली असून, भाविकांना कोणतीही अडचण न येता ते कथासुखाचा आस्वाद घेत आहेत.
पहिल्याच दिवशी लाखो भक्तांनी भगवान शिवाचे दर्शन घेतले असून, पुढील चार दिवसांतही भाविकांचा प्रचंड ओघ राहील, असा आयोजकांचा अंदाज आहे. शिर्डीतील ही शिवमहापुराण कथा केवळ धार्मिक सोहळा नसून, श्रद्धा, भक्ती आणि समाजसेवेचा संगम ठरत आहे. या अध्यात्मिक पर्वामुळे शिर्डी परिसरात नवचैतन्य, आनंद आणि शिवभक्तीचा महासागर उसळला असून, हा सोहळा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.