सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी - आमदार अमोल खताळ
◻️ संगमनेर येथे एकता दौड स्पर्धेत एक हजार विद्यार्थ्याचा सहभाग
संगमनेर LIVE | भारताचे कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाची अखंडता आणि एकता अबाधित राखण्यासाठी मोलाचे योगदान दिले. या युगपुरुषांच्या कार्यातून आणि विचारांतून प्रेरणा घेऊन प्रत्येक भारतीय नागरिकांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर उपविभाग व संगमनेर शहर पोलीसांच्या वतीने आयोजित एकता दौड स्पर्धेचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, भाजप तालुकाध्यक्षा पायल ताजणे तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि स्पर्धक यावेळी उपस्थित होते.
यावेळी आमदार अमोल खताळ म्हणाले की, देश स्वतंत्र झाल्यानंतर खरी एकात्मता टिकवण्याचे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. जुनागढ, काश्मीर आणि हैदराबाद या संस्थानांच्या विलिनी करणाच्या वेळी त्यांनी दाखवलेली कणखर भूमिका खऱ्या अर्थाने देशाच्या अखंडतेसाठी ऐतिहासिक ठरली. त्याग, शिस्त आणि राष्ट्रीय एकतेचा आदर्श प्रत्येक भारतीयाने त्यांच्या जीवनातून घ्यावा, असा सल्ला दिला.
याप्रसंगी पोलीस भरतीसाठी तयारी करत असलेल्या शहरातील विविध अकॅडमीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सहभाग पाहून आमदार खताळ यांनी समाधान व्यक्त केले. या स्पर्धेत विजेत्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करून आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी शुभेच्छा दिल्या.
पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी सांगितले की, “एकता दौड स्पर्धेमागचा उद्देश म्हणजे भारताची अखंडता आणि एकता टिकवण्याचा संदेश जनतेपर्यत पोहोचवणे हा आहे.”
दरम्यान पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी स्पर्धेचे उद्दिष्ट आणि नियोजन स्पष्ट केले.
अहिल्यानगर पोलीस संगमनेर उप विभाग आणि संगमनेर शहर पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या एकता दौड स्पर्धेत पुरुष गटाची स्पर्धा संगमनेर नगर पालिका क्रीडा संकुल ते नाशिक महामार्ग (१३२ केव्ही अकोले बायपास) या मार्गावर तर मुलींची स्पर्धा संगमनेर नगरपालिका क्रीडा संकुल ते कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्गावर घेण्यात आली. सर्व विजेत्या स्पर्धकांना आमदार अमोल खताळ पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
विजेता ज्येष्ठ नागरिक गट..
१) अशोक नवले - प्रथम २) गणेशकुमार बाहेती - द्वितीय ३) दीपक क्षत्रिय - तृतीय
विजेता मुलांचा गट..
१) सुरज अनिल कदम - प्रथम
२) विशाल नंदू थोरात - द्वितीय
३) विजय रामनाथ सोनवणे - तृतीय
विजेता मुलींचा गट..
१) धनश्री दत्तू हुलगिर - प्रथम
२) वर्षा बाळासाहेब बर्डे - द्वितीय
३) रूपाली मच्छिंद्र सोडणर - तृतीय