अमृत उद्योग समूहात स्व. इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन
◻️ पाकला धडा शिकवणाऱ्या स्व. इंदिरा गांधी देशाच्या कणखर पंतप्रधान - डॉ. सुधीर तांबे
संगमनेर LIVE | बांगलादेशची निर्मिती, बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थांचे विलीनीकरण यासारखे अनेक निर्णय घेणाऱ्या स्वर्गीय इंदिरा गांधी यांचे व्यक्तिमत्व धाडसी व पराक्रमी होते. देशाच्या एकात्मता व अखंडतेसाठी बलिदान देणाऱ्या इंदिरा गांधी यांनी आपल्या कर्तृत्वातून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा निर्माण केला. पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या इंदिरा गांधी या देशाच्या कणखर पंतप्रधान होत्या. असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील शक्तीस्थळ येथे देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त व पहिले गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग घुले, बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, ॲड. नानासाहेब शिंदे, आर. बी. रहाणे, संचालक संपतराव गोडगे, दिलीप नागरे, अंकुश ताजने, सह्याद्रीचे सह सेक्रेटरी प्रा. बाबा खरात, गुलाबराव देशमुख, भास्करराव आरोटे, संभाजी वाकचौरे, डॉ. थोरात, सुरेश झावरे, सौ. सुंदराबाई रावसाहेब दुबे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे व अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.तांबे म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वाबद्दल नितांत आदर होता. इंदिराजींच्या कार्यातून पुढील पिढीला प्रेरणा मिळावी याकरता नवी दिल्लीच्या धरतीवर अमृत उद्योग समूहामध्ये त्यांनी शक्तीस्थळ निर्माण केले. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी विविध तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने आपण या ठिकाणी आयोजित करतो. इंदिराजींनी धर्मनिरपेक्ष भारताची पायाभरणी केली असून देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानाचा विसर होणे हा कृतघ्नपणा आहे.
देशाच्या विकासात इंदिरा पर्व अत्यंत महत्त्वाचे असून हरितक्रांती,विज्ञान क्रांती घडवणाऱ्या इंदिराजींनी पाकिस्तानला धडा शिकून बांगलादेशची निर्मिती केली. बँकांच्या राष्ट्रीयकरणासह अनेक मोठे निर्णय त्यांनी घेतले. आपल्या स्वकर्तृत्वावर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा दबदबा त्यांनी निर्माण केला. तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी ६०० संस्थांनी देशात विलगीकरणाचे काम केले. सरदार पटेल हे भारतीय निष्ठेचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले.
पांडुरंग घुले म्हणाले की, आज देशामध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. मनभेद निर्माण झाले आहे. जाती - जातीमध्ये भांडणे लावले जात आहे. बेरोजगारी, महागाई प्रचंड वाढली आहे. फक्त जाहिरातबाजी मधून कणखरता दाखवली जाते मात्र, सरकार हे पराभूत मानसिकतेचे असल्याचे ते म्हणाले. तर प्रा. बाबा खरात म्हणाले की, देशाची अखंडता व एक राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी बलिदान देणाऱ्या इंदिराजींचे जीवन कार्य तरुण पिढीसाठी सदैव प्रेरणादायी आहे.