अहिल्यानगर जिल्ह्यात राज्यातील पहिले सहकार विद्यापीठ स्थापन करावे
◻️ केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे आमदार अमोल खताळ यांची मागणी
संगमनेर LIVE | गुजरात राज्यात स्थापन करण्यात आलेल्या गुजरात सहकार विद्यापीठाच्या निर्णयाचे स्वागत करत महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्राच्या विकासासाठी राज्यातील पहिले सहकार विद्यापीठ अहिल्यानगर जिल्ह्यात स्थापन करावे. अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी कद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे लोणी येथे केली.
अहिल्यानगर जिल्ह्यात साखर, दूध, बॅकींग आणि कृषी क्षेत्रातील सहकारी संस्था प्रभावीपणे कार्यरत आहेत. त्यामुळे सहकार क्षेत्राच्या शैक्षणिक आणि संशोधनात्मक उन्नतीसाठी महाराष्ट्रातही असे विद्यापीठ स्थापन होणे गरजेचे आहे. असे दिलेल्या निवेदनात आमदार खताळ यांनी म्हटले आहे. यासह नाशिक - पुणे रेल्वेमार्ग संगमनेर मार्गे नेण्याची मागणी करताना हा रेल्वे प्रकल्प औद्योगिक, कृषी आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचे म्हणत केंद्र सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली.
नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्ग (एनएच - ६०) सध्या बहुतांश भागामध्ये केवळ दोन किंवा चार लेन आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात, विलंब व प्रवासात अडचणी अशा अनेक समस्या निर्माण होत असल्याने महामार्ग सहा पदरी करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. तसेच संगमनेर येथे कृषी हब म्हणून विकसित करण्याची, तालुक्यासाठी स्वतंत्र कामगार रुग्णालय स्थापन करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
या सर्व मागण्याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या सर्व मागण्यांचा मी वेळोवेळी पाठ पुरावा करणार असून त्या पूर्ण झाल्यास संगमनेर तालुका तसेच अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वागीण विकासाला नवे बळ मिळेल. असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.