मागील हंगामातील ऊसाला ३ हजार २०० रुपये भाव देणार - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
मागील हंगामातील ऊसाला ३ हजार २०० रुपये भाव देणार - बाळासाहेब थोरात

◻️ सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ संपन्न

◻️ ‘..त्या’ घोषणेसाठी मुख्यमत्री फडणवीस यांचे बाळासाहेब थोरातांकडून अभिनंदन 


संगमनेर LIVE | यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला असून राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी केल्याशिवाय पर्याय नाही. सरकारने पंजाब सरकार प्रमाणे प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करणे गरजेचे आहे. असे आवाहन ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी करताना मागील हंगामासाठी सहकारमहर्षी थोरात कारखाना प्रति टन ३ हजार २०० रुपये भाव देणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ ते बोलत होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांवर थोरात कारखान्याने कायम काटकसर, अचूकता व पारदर्शक निर्णय घेत चांगली वाटचाल केली आहे. कारखानदारीमध्ये मोठी स्पर्धा आहे. उसाची पळवा पळवी होणार आहे. दरवर्षी किमान नऊ लाख मेट्रिक टन गाळप होणे हे गरजेचे आहे .थोरात कारखान्याने १५ लाख मेट्रिक टना पर्यंत गाळप करून आपली क्षमता सिद्ध केली आहे. 

कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्र बाहेर सभासद व ऊस उत्पादकांचा कारखान्यावर कायम मोठा विश्वास राहिला आहे. आगामी काळामध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये एकरी उत्पादन वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना दिवाळीनिमित्त २०० रुपये प्रति टन देण्यात येणार असून त्यामुळे आता थोरात कारखान्याकडून ऊस उत्पादकांना ३,२०० रुपये प्रति टन भाव मिळणार आहे. तर कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांना दीपावली निमित्त १०० रुपये प्रति टन प्रमाणे मिळणार आहेत.

यावर्षी राज्यात चांगला पाऊस झाला. मात्र, मराठवाडा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडले. शेतीचे मोठे नुकसान झाले अशा काळामध्ये सरकारने पंजाब सरकारच्या धर्तीवर हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत केली पाहिजे. याचबरोबर शेतकऱ्यांना आत्ताच कर्जमाफी करा. आता त्यांना खरी गरज असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.

याचबरोबर सततच्या पावसाने अकोले संगमनेर तालुक्यामधील अनेक पिके वाया गेली आहेत आपण मंत्री असताना २००५-०६ मध्ये शेतकऱ्यांना एकरी मोठी मदत केली होती, तशी मदत आता मिळाली पाहिजे.

संगमनेर तालुका हा सततच्या विकास कामातून आपण वैभवशाली बनवला. आज सर्व क्षेत्रांमध्ये संगमनेरचे नाव अग्रगण्य आहे. मात्र, काही लोक तालुक्याला बदनाम करत असून खोट्या नाट्या केसेस टाकल्या जात आहे. बाहेरच्या संदेशावर ते काम करत आहे. नुसते फ्लेक्स लावू नका तर मदत करा अशी मागणी त्यांनी केली. 

याचबरोबर तालुक्यातील विकासाची वाटचाल कायम ठेवण्यासाठी आपल्यातील मतभेद दूर करा. आपला तालुका आपले वातावरण चांगले असून हे इतरांना सांगा. आपण धार्मिक आहोत हिंदूधर्मीय आहोत परंतु आपण इतर धर्माचा द्वेष करत नाही. मानवता हा धर्म घेऊन चालत असून सर्वांनी तालुक्याची वाटचाल जपण्यासाठी कटिबद्ध रहा, असे आवाहन केले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे देखील भाषण झाले.
 
मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचा मुद्दा महत्त्वाच्या व्यासपीठावर मांडला..

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये साखर कारखान्यांमधून शेतकऱ्यांचा काटा मारला जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला व त्यावर कारवाई करणार असे म्हटले. हे अत्यंत अभिनंदन असून त्यांनी अशा कारखान्यांवर कारवाई केलीच पाहिजे. यामधून शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी योग्य व्यासपीठावर योग्य मुद्दा मांडल्याने त्यांचे अभिनंदन असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !