प्रदूषण महामंडळाच्या आश्वासनानंतर सातव्या दिवशी उपोषण मागे
◻️ सौ. नीलम खताळ आणि नायब तहसीलदार सुभाष कदम यांची उपोषणकर्त्याशी चर्चा
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथील स्टोन क्रशरच्या संदर्भात उप प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण महामंडळाने तपासणी करून दोशी असणाऱ्या सर्व स्टोन क्रेशर धारकांवर कारवाई करावी आणि त्याबाबतचा अहवाल तहसील कार्यालयाला सादर करावा, असे लेखी आश्वासन तहसीलदार धीरज मांजरे यांनी नायब तहसीलदार सुभाष कदम यांच्या मार्फत उपोषणकर्त्याना दिले आहे. या लेखी आदेशानंतर आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ. नीलम खताळ यांच्या हस्ते पिंपळे येथे गेली सात दिवस सुरू असणारे उपोषण लिंबू पाणी देऊन मागे घेण्यात आले.
तालुक्यातील पिंपळे गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी जानकु बाबा ढोणे यांनी २५० एकर जमीन दान दिली त्यावेळी मंदिर विश्वस्त समिती बनवण्यात आली होती. मात्र, कालांतराने या समितीमधील सर्वजण वयोमानानुसार निधन पावले. त्यानंतर या मंदिराची देखभाल करण्याचे काम पिंपळे ग्रामपंचायतीकडे आले. जमिनीचा परिसर डोंगराळ भाग असल्यामुळे पिंपळे ग्रामपंचायतीच्या तात्कालीन पदाधिकाऱ्यांनी तब्बल अडीशे एकर जमीन स्टोन क्रेशरधारकांना विकून टाकली आणि महसूलची परवानगी न घेता या गावात स्टोन क्रेशर सुरू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यामुळे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यामध्ये लक्ष घालून पिंपळे ग्रामपंचायतीच्या गेल्या दोन दशकांच्या कारभाराची सखोल चौकशी करावी, या देवस्थानाची लाटलेली २५० एकर जमिन परत मिळवून द्यावी, तसेच अनाधिकृत स्टोनक्रेशर धारकांनी महसूलची कुठली परवानगी न घेता परस्पर लाखो ब्रासचे उत्खणन केले त्या पोटी शासनाची बुडवलेली रॉयल्टी वसुल करावी, या परिसरातील सर्व स्टोनक्रशर कायम स्वरुपी बंद करावेत. या मागणीसाठी या गावातील ग्रामपंचायत समोरील विठ्ठल मंदिरासमोर आण्णासाहेब चकोर आणि रमेश ढोणे या दोन शेतकऱ्यांनी दि. ३० सप्टेंबर २०२५ पासून उपोषण सुरू केले होते.
या उपोषणा संदर्भातील माहिती भाजप अभियंता सेलचे राज्य उपाध्यक्ष हरिश्चंद्र चकोर यांनी आ. अमोल खताळ यांना दिली. त्यांनी तात्काळ तहसीलदार धीरज मांजरे यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर आमदार खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, अभियंता शेळके, राज्य उपाध्यक्ष हरिश्चंद्र चकोर आणि नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी उपोषण कर्त्याची भेट घेऊन या स्टोन क्रेशरची प्रदूषण महामंडळाच्या विभागाकडून तपासणी करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर उपोषणकर्त्यानी सौ. खताळ यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन आपले उपोषण मागे घेतले.