थोरात कारखान्यातील कामगारांना २० टक्के बोनस व ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान
◻️ दीपावलीनिमित्त अमृत उद्योग समूहातील संस्थांच्या माध्यमातून बाजारपेठेत १०० कोटीची उलाढाल होणार
संगमनेर LIVE | सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वावर यशस्वी वाटचाल करताना थोरात सहकारी साखर कारखान्याने देश पातळीवर आपला लौकिक निर्माण केला आहे. उच्चांकी भाव देताना कायम शेतकरी सभासद व कामगारांचे हित जोपासले असून दिवाळीनिमित्त दरवर्षीप्रमाणे कामगारांना २० टक्के बोनस व ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान मिळणार असल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही घोषणा केली होती.
बाळासाहेब थोरात म्हणाले की कारखान्याने कायम सभासद शेतकरी व कामगारांचे हित जोपासत गौरवास्पद वाटचाल केली आहे. सभासद शेतकरी व ऊस उत्पादकांची दिवाळी गोड होणार असून दरवर्षीप्रमाणे कारखान्याकडून कामगारांसाठी २० टक्के बोनस व ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.
कारखान्यातील कर्मचाऱ्यांची अनेक मुले उच्च पदावर काम करत असून देश विदेशात कार्यरत आहे हे आपल्या सर्वासाठी अभिमानास्पद आहे. कारखान्याने कायम तालुक्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. कर्मचाऱ्यांचे यामध्ये मोठे सहकार्य राहिले असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान सहकारामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत असून त्यामुळे संगमनेर शहरातील बाजारपेठ भरलेली आहे अमृत उद्योग समूहातून विविध संस्थांमधून सुमारे १०० कोटी रुपये बाजारात येत असल्याने संगमनेरकरांची दिवाळी ही आनंदाची होत असते यावर्षीही दिवाळी होणार आहे.