सोयाबीन खरेदी केंद्रांच्या मागणीसाठी बलिप्रतिपदेला राज्यभर आंदोलन
◻️ कर्जमुक्ती व वाढीव नुकसान भरपाई मिळावी यासाठी किसान सभेचा निर्धार
संगमनेर LIVE (नाशिक) | अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची पिके, गोठे, विहिरी, जमिनी नष्ट झाल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांना पुरेशी मदत सरकारच्या वतीने झाली नाही.
सोयाबीनला केंद्र सरकारने ५ हजार ३२८ रुपये हमी भाव जाहीर केला. मात्र अद्याप एकही सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. निवडणुकीत कर्जमाफीची घोषणा केली. मात्र आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा कर्जमाफी केली नाही. शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर तीव्र लढा संघटित करण्यासाठी किसान सभेच्या वतीने नाशिक येथे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. १६ व १७ ऑक्टोबर असे दोन दिवस पार पडलेल्या कार्यशाळेत राज्यभरातील २०० हून अधिक निवडक शेतकरी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
या कार्यशाळेला डॉ. अशोक ढवळे, माजी आ. जे. पी. गावीत, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, सुनील मालुसरे यांनी मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर बलिप्रतिपदा दिनी २२ ऑक्टोबर रोजी राज्यभर गावोगावी आंदोलन करण्याचा निर्णय कार्यशाळेत घेण्यात आला आहे. सोयाबीन खरेदी केंद्र प्रत्येक बाजार समितीत सुरू करा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, अतिवृष्टी नुकसान भरपाई मदतीत भरीव वाढ करून किमान ५० हजार रुपये एकरी मदत द्या या मागण्यांसह १० मागण्यांसाठी गावस्तरावर हे आंदोलन करण्यात येईल. बलिप्रतिपदेच्या दिनी गावाच्या चावडीवर सोयाबीन ओतून हे आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना जाहीर केलेलं पॅकेज ३१ हजार ६०० कोटींचे असल्याचे सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात जुन्याच अनेक योजनांची बेरीज करून सरकारने हा आकडा फुगविला आहे. प्रत्यक्षात केवळ ६ हजार ५०० कोटी इतकीच रक्कम सरकारने नव्याने दिलेली आहे. शेतकरी कर्जमुक्तीचे दिलेले आश्वासनही सरकारने पाळलेले नाही. शेतकऱ्यांचा या सर्वामुळे मोठा विश्वासघात झाला आहे.
त्यामुळे दीपावली नंतर या प्रश्नावर मोठे राज्यव्यापी आंदोलन उभे करण्याचा निर्णय किसान सभेने घेतला आहे. अशी माहिती डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख यांनी दिली.