स्वर्गीय आ. शिवाजीराव कर्डिले हे ग्रामीण शहाणपण असलेले नेतृत्व - बाळासाहेब थोरात
◻️ आमदार सत्यजीत तांबे आणि डॉ. सुधीर तांबे यांनी शोकभावना केल्या व्यक्त
संगमनेर LIVE | आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आहे. अनेक वर्ष विधानसभेत त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. जनसामान्यांची भावना जाणणाऱ्या या नेतृत्वाच्या निधनाने ग्रामीण विकासाची दृष्टी असलेले आणि ग्रामीण शहाणपण असलेले लोक नेतृत्व हरपले असल्याची भावना कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
माजी मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, त्यांच्या निधनाची बातमी ही अत्यंत दुःखदायक आहे. अनेक वर्षे त्यांनी विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केले. याचबरोबर राज्य मंत्रिमंडळातही दुग्धविकास मंत्री म्हणून काम केले. ग्रामीण विकासाची जाण असलेले आणि ग्रामीण शहाणपण असलेले हे नेतृत्व होते. जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी प्रभावी काम केले मुद्देगिरी असणाऱ्या आणि जन माणसांची भावना जपणारे लोक नेतृत्व हरपले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
नगर जिल्ह्यातील राजकारणाचे जादूगार - आमदार सत्यजीत तांबे
आमदार शिवाजीराव कर्डिले हे प्रस्थापित नसतानाही प्रस्थापितांच्या जिल्ह्यात स्वतःचा एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने राजकारण करून वेगळा ठसा उमटवणारे नेतृत्व होते. त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि हादरवून टाकणारी आहे.
पैलवान व्यक्तिमत्व असलेले आणि सतत हसतमुख आणि सकारात्मक विचारांचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी सरपंच ते मंत्री असा राजकीय प्रवास केला. माझ्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या काळात त्यांची रणनीती, विचारांची खोली आणि संघटन शक्ती अनुभवण्याचा मला योग आला. कायम लोकांमध्ये राहणारे,थेट बोलणारे, कृतिशील व्यक्तिमत्व हरपले असल्याची भावना आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली.
संघर्षशील नेतृत्व हरपले - मा. आमदार डॉ. सुधीर तांबे
बुरहानपुर चे सरपंच ते राज्याचे मंत्री असा प्रवास राहिलेल्या शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आपल्या मैत्रितून माणसे जोडली. रोखठोक स्वभाव आणि प्रत्येक गोष्ट हसत खेळत घेत माणसं जोडण्याची त्यांची कला ही अनोखी होती. जिल्ह्याच्या राजकारणावर चांगली पकड असलेला एक कर्तबगार व मुसद्दी राजकारणी हरपले असल्याची भावना माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आहे.