ग्रामीण अर्थकारणाची उत्तम जाण असलेला नेता हरपला - मुख्यमंत्री फडणवीस

संगमनेर Live
0
ग्रामीण अर्थकारणाची उत्तम जाण असलेला नेता हरपला - मुख्यमंत्री फडणवीस 

◻️ स्वर्गीय शिवाजी कर्डिले यांच्या कुटुंबीयांचे मुख्यमंत्र्यांनी केले सांत्वन 


संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार स्वर्गीय शिवाजी कर्डिले यांच्या बुऱ्हाणनगर येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्वर्गीय शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय, जावई आमदार संग्राम जगताप व कुटुंबातील इतर सदस्यांना धीर देत सांत्वन केले.

याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार विठ्ठल लंघे, आमदार राहुल कुल, पद्मश्री पोपट पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी उपस्थित होते.
 
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्वर्गीय शिवाजीराव कर्डीले हे सहकार, शेती व ग्रामीण अर्थकारणाची उत्तम जाण असलेले, तसेच ग्रामीण भागाशी घट्ट नाळ जोडलेले व्यक्तिमत्त्व होते.  सामान्य जनतेच्या सुख-दुःखात सदैव सहभागी राहणारे, व्यापक जनसंपर्क असणारे व विचारांची स्पष्टता जपणारे सर्वसामान्यांच्या माणूस म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण जिल्हावासियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आपल्या कष्ट, चिकाटी व संघर्षाच्या जोरावर त्यांनी कारकीर्द घडवली. समाजकारण, राजकारण करत असताना अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या निधनाने सर्वगुणसंपन्न, लोकहितैषी नेतृत्व हरपले असून एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !