पहिला स्व. कांताबाई सातारकर पुरस्कार तमाशा कलावंत आवळे मास्तर यांना जाहिर
◻️ आमदार अमोल खताळ यांची माहिती
◻️ मंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण
संगमनेर LIVE | ज्येष्ठ तमाशा कलावंत स्व. कांताबाई सातारकर यांच्या नावाने देण्यात येणार पहिला पुरस्कार वाई येथील ज्येष्ठ तमाशा कलावंत कोंडीराम लक्ष्मण आवळे मास्तर यांना जाहिर झाला असून, २ नोव्हेंबर रोजी या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
या संदर्भात माहीती देताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, संगमनेरचे भूमिपुत्र असलेले कवी अनंत फंदी, पहिल्या महिला तमाशा कलावंत स्व. पवळा भालेराव, स्व. गुलाबबाई संगमनेरकर, लोकशाहीर विठ्ठल उमप, तमाशा कलावंत स्व. कांताबाई सातारकर यांच्या नावाने दरवर्षी राज्यातील कलावंताना पुरस्कार देवून सन्मानित करण्याचा निर्णय आपण जाहीर केला होता.
यातील पहिला पुरस्कार स्व. कांताबाई सातारकर यांच्या नावाने देण्यात येणार असून, यंदाच्या वर्षीचा पहिला पुरस्कार तमाशा कलेमध्ये आपले अनमोल असे योगदान देणारे वाई येथील कोंडीराम लक्ष्मण आवळे यांना देण्याचा निर्णय पुरस्कार निवड समितीने घेतला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप २१००० रोख, मानपत्र, शाल श्रीफळ असे असणार आहे. मुंबई विद्यापीठातील कला विभागाचे प्रमुख व गायक प्रा. गणेश चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या पुरस्कार निवड समितीने आवळे मास्तर यांची पुरस्कारासाठी निवड केली.
१९७३ पासून त्यांनी तमाशा कलेसाठी स्वत:ला झोकून दिले. सात वगनाट्य त्यांनी शब्दबध्द केली असून, अतिशय बिकट अशा कौटूंबिक परिस्थितीवर मात करुन, त्यांनी पारंपारिक तमाशा कला जिवंत ठेवण्यासाठी कष्ट घेतले. चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ता महाडीक यांच्या बरोबरीने तमाशा कलेमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाचा यथोचित गौरव म्हणून आवळे मास्तर यांना सन्मानित करण्याचा निर्णय यावर्षी घेण्यात आल्याचे आमदार खताळ म्हणाले.
दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री नामदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत तसेच जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन संगमनेर येथे करण्यात आले असून, जिल्ह्यातील तसेच राज्यातील तमाशा कलेतील असंख्य मान्यवर कलाकार या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार अमोल खताळ यांच्यासह पुरस्कार वितरण समारंभ समितीचे सदस्य ज्येष्ठ नाट्य लेखक दिग्दर्शक डॉ. सोमनाथ मुटकुळे, पत्रकार सौ. स्मिता विनय गुणे, अण्णासाहेब काळे, निलिमा घाटगे, सुशांत पावसे, राहूल सोमवंशी यांनी केले आहे.