पंडीत प्रदीप मिश्रा महाराज यांच्या स्वागतासाठी दोन हजार युवकांची दुचाकी रॅली
◻️ “जय श्रीराम आणि हर हर महादेव” या जयघोषाने सहकाराची पंढरी दुमदुमली
संगमनेर LIVE (लोणी) | पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या स्वागतासाठी दोन हजार युवकांनी दुचाकी वाहनांची रॅली काढून लोणीपर्यत स्वागत केले. “जय श्रीराम आणि हर हर महादेव” असा जयघोष करून सहकार पंढरीत सांयकाळी आगमन झाल्या नंतर विखे कुटुंबियांनी निवासस्थानी त्यांचे स्वागत केले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील, ध्रृव विखे पाटील यांच्यासह लोणी ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मंत्री विखे पाटील यांच्या निवासस्थानी आगमन झाल्यानंतर सौ. शालिनी विखे पाटील, सौ. धनश्री विखे पाटील यांनी औक्षण आणि पाद्यपूजन करून त्यांचे स्वागत केले.
प्रसिद्ध कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या लोणी येथील वास्तव्यानिमित्त राहता ते लोणी पर्यत अभूतपूर्व मोटारसायकल रॅली काढण्यात आली. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तब्बल दोन ते अडीच हजार युवकांनी भगव्या पताका फडकवत “हर हर महादेव”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
रॅलीचा प्रारंभ अस्तगाव येथून झाला असून, ती राहता मार्गे लोणी येथील विखे पाटील निवासस्थानावर पोहोचली, जिथे पंडित प्रदीप मिश्रा हे वास्तव्यास असणार आहेत. मार्गात सर्वत्र नागरिक, महिला मंडळे व युवक संघटनांनी महाराजांचे स्वागत केले.
या रॅलीसाठी अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात आले होते. वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, फुलसजावट, साऊंड सिस्टीम आणि स्वयंसेवकांची नेमणूक यासाठी वेगवेगळ्या समित्या कार्यरत होत्या. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वतः नियोजनाचे मार्गदर्शन केले होते.
युवकांमध्ये उत्साह निर्माण केला..
रॅलीतील सर्व सहभागी युवकांनी भगव्या झेंड्यांसह आणि ‘शिवमहापुराण की जय’, ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’च्या जयघोषात शिस्तबद्ध मिरवणूक काढली. राहता-लोणी मार्ग भगव्या झेंड्यांनी सजविला गेला होता. अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी जलपान आणि फुलवृष्टी करून स्वागत केले.
दरम्यान या रॅलीत शेकडो महिला, वारकरी, झांज पथक, ढोल पथक आणि स्वयंसेवक सहभागी झाले होते. सर्वानी मिळून ही भक्तिभावाची यात्रा उत्साहात पार पाडली.