शिवपुराण कथेचा कार्यक्रम जिल्ह्यांसाठी ऐतिहसिक सोहळा ठरेल - मंत्री विखे पाटील
◻️ उद्यापासून पंडीत प्रदीप मिश्रा महाराज यांच्या शिवपुराण कथेला सुरुवात
संगमनेर LIVE (राहाता) | पंडीत प्रदीप मिश्रा महाराज यांच्या शिवपुराण कथेचा कार्यक्रम जिल्ह्याच्या परंपरेला साजेसा ऐतिहसिक अध्यात्मिक सोहळा ठरणार असून भाविकांच्या गर्दीचा उच्चांक मोडणारा ठरेल. असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
अस्तगाव येथे ७५ एकराच्या भव्य मैदानावर रविवार पासून पंडीत प्रदीप मिश्रा महाराज यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्री विखे पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रम स्थळाची पाहाणी करून तयारीचा आढावा घेतला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, विनायकराव देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अतिरीक्त पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे, तहसिलदार अमोल मोरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की, पंडीत प्रदीप मिश्रा महाराज यांची अध्यात्मिक क्षेत्रात मोठा नावलौकीक आहे. त्यांच्या सुश्राव्य वाणीतून शिवपुराण ऐकण्याची संधी जिल्ह्यातील भाविकांना प्रथमच मिळत आहे. आजपर्यत ज्या ठिकाणी त्यांच्या कथेचे आयोजन झाले त्यापेक्षाही मोठा उच्चांक ठरेल असे नियोजन जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
कार्यक्रम स्थळावर तीन भव्य मंडप उभारण्यात आले असून, मुख्य मंडपात एक लाखाहून अधिक भाविक बसू शकतील तसेच अन्य दोन मंडपातही त्याच पध्दतीचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. शंभर बचत गटांना त्यांच्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी स्टाॅल देण्यात आले असून स्वयंसेवक म्हणून नोंदणी केलेल्या भाविकाच्या निवासाची तसेच भोजनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असल्याचे विखे पाटील म्हणाले.
जिल्ह्यासह राज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या विचारात घेता दोन स्वतंत्र पार्कीग व्यवस्था करण्यात आल्या असून सुरक्षा वैद्यकीय मदत यासाठी सुध्दा विशेष यंत्रणा कार्यान्वित केले असल्याचे त्यांनी सांगितले.
भाविकांची संख्या वाहतूक व्यवस्था यामुळे नगर मनमाड मार्गावरील वाहतूकीला कोणतीही अडचण होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल मात्र परीस्थिती पाहून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येईल.
एवढ्या मोठ्या नियोजनात थोड्या त्रृटी राहाण्याची शक्यता आहे. मात्र येणारे भाविक स्थानिक व्यावसायिक आणि नागरीक या सर्वानी शिर्डीच्या अध्यात्मिक भूमीत होत असलेला सोहळा आपल्या परीवारातील आहे असे समजून सहकार्य करण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेला अध्यात्मिक सोहळा आपल्या सर्वासाठी तसेच प्रशासनासाठी नियोजनाच्या दृष्टीने अनुभव ठरेल आशी अपेक्षा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.
दरम्यान पंडीत प्रदीप मिश्रा महाराजांचे दुपारी चार वाजता शिर्डी विमानतळावर आगमन झाले. डॉ. सुजय विखे पाटील महाराजांना आणण्यासाठी स्वता भोपाळ येथे गेले होते. मंत्री विखे पाटील यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.