पाच ग्रामपंचायतीना कार्यालय उभारण्यासाठी १ कोटी २० रुपये निधी मंजूर
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यातून तालुक्यातील ग्रामविकासाला गती
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींकडे स्वतःचे कार्यालय नाही, अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत उभारण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेच्या अंतर्गत निधी मंजूर झाला आहे. यामध्ये तालुक्यातील सावरगाव तळ, निमोण, झोळे, सावरचोळ या ग्रापपंचायतींना प्रत्येकी २५ लाख तर दरेवाडी ग्रामपंचायतीला २० लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
तालुक्यातील ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत नाही अशा ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने अनुदान द्यावे. अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर पहिल्या टप्प्यात सावरगाव तळ, निमोण, सावरचोळ, झोळे, दरेवाडी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या निर्णयामुळे गावात चांगले ग्रामपंचायत भवन उभे राहून ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय कामकाज अधिक सुसूत्रता येईल. तसेच ग्रामस्थांना सेवांचा लाभ घेण्यासाठी कायमस्वरूपी कार्यालयाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आमदार अमोल खताळ यांनी आभार मानले आहेत.
ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीला विशेष असे स्थान प्राप्त झाले आहे. आता नव्याने बांधण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये सुसज्ज सुविधा प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांना बसण्यासाठी कार्यालय करण्यात येईल. यासोबत ग्रामपंचायतीच्या विविध बैठकींसाठी सभागृहाची तरतूद देखील असेल. तसेच प्रसाधन गृह देखील उभारण्यात येणार आहे. परिणामी गाव कारभाऱ्यांची व ग्रामस्थांची नवीन ग्रामपंचायत कार्यालयामुळे चांगलीच सोय होणार आहे. अशी प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी दिली.