आश्वी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर उभ्या असलेल्या दोन दुचाकी जाळल्या
◻️ शुक्रवारी मध्यरात्री घडली घटना; अंदाजे दीड लाखांचे नुकसान
संगमनेर LIVE | शहरांपाठोपाठ आता ग्रामीण भागात देखील रात्री - अपरात्री गाड्या पेटवून देण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर उभ्या असलेल्या दोन दुचाकी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, आश्वी बु।। बाजारतळाशेजारी गारुडी समाजाची वस्ती आहे. याचं ठिकाणी पिरबाबा मंदिर देखील आहे. या मंदिराच्या समोर पार्वती ज्ञानदेव लोंढे यांची बजाज कंपनीची प्लॅटीना (एमएच १७ डी ६९६७) आणि भारत लोंढे यांची पॅशन प्रो-होंडा (एमएच १७ एक्स ८५६८) या दोन दूचाकी लावलेल्या होत्या. शुक्रवारी मध्यरात्री सर्वत्र सामसूम पाहून अज्ञात व्यक्तीने या दोन्ही दुचाकी पेटवून दिल्या. रात्रीची वेळ आल्याने ही घटना स्थानिकांच्या उशीरा लक्षात आली. मात्र, तोपर्यत दोन्ही दुचाकी मोठ्या प्रमाणात जळाल्या होत्या.
या दुर्दैवी घटनेमुळे लोंढे कुटुंबियांचे अंदाजे दीड लाख रुपये नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे आश्वी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आणि भर वस्तीत हि घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तर, या अज्ञात व्यक्तीला पकडल्यानंतरच या घटनेचा उलगडा होणार असल्याने त्याला पकडण्याचे मोठे आवाहन पोलीसापुढे उभे ठाकले आहे.
दरम्यान या अनामिक घटनेमुळे रात्री घराबाहेर, रस्त्याच्या कडेला अथवा अंगणात दुचाकी किंवा चारचाकी वाहन लावणाऱ्या वाहनधारकांमध्ये मात्र, दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.