पुणे येथील ‘मुक्ताज किचन’ची आंतरराष्ट्रीय भरारी
◻️ प्रियंका व विलास मोहारे यांची यशोगाथा सातासमुद्रापार
संगमनेर LIVE (पुणे) | पुणे भोसरी येथील उद्योजक दांपत्य प्रियंका मोहारे आणि विलास मोहारे यांनी आपल्या ‘मुक्ताज किचन’ या उपक्रमाच्या माध्यमातून घरगुती चवीचा सुगंध देशाबाहेर पोहोचवला आहे. पारंपरिक नोकरीचा सुरक्षित मार्ग सोडून स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा धाडसी निर्णय घेतलेल्या या दांपत्याने अवघ्या काही वर्षांत ‘मुक्ताज किचन’ला ओळख मिळवून दिली आहे.
मागील पाच वर्षापासून अत्यंत काटेकोरपणे, गुणवत्ता आणि स्वच्छतेला प्राधान्य देत त्यांनी घरगुती फूड सर्व्हिस व्यवसायात आपला ठसा उमटवला आहे. यंदाच्या दिवाळीमध्ये मुक्ताज किचनने तयार केलेला पारंपरिक फराळ केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, दुबई इत्यादी देशांपर्यंत पोहोचवून व्यवसायाला आंतरराष्ट्रीय स्वरूप दिले आहे.
प्रियंका मोहारे या केमिस्ट्री पदवीधर असून त्यांना पाककलेची आवड आहे. त्यांनी आपल्या कौशल्याला व्यवसायिक रूप देत विविध प्रकारचे घरगुती पदार्थ - फराळाचे पदार्थ, स्नॅक्स, आणि डबेवाला सर्व्हिस - या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. तर विलास मोहारे हे संगणक अभियंता असून त्यांनी यूपीएससीसारख्या कठीण परीक्षाही दिलेल्या आहेत. तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि व्यवस्थापन कौशल्य यांच्या जोडीला मेहनत आणि चिकाटी यांची जोड देत त्यांनी व्यवसायात उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
‘मुक्ताज किचन’चा उद्देश फक्त नफा कमावणे नसून, घरगुती चवीची परंपरा आधुनिक जगात पोहोचवणे हा आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील लघुउद्योजक आणि विशेषतः महिला उद्योजिकांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.
भविष्यात मुक्ताज किचनचे विस्तार राज्यभरातील विविध शहरांमध्ये करण्याचा मोहारे दांपत्याचा मानस आहे. त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांमुळे मराठी व्यावसायिकांना जागतिक स्तरावर स्थान मिळविण्याचा मार्ग अधिक रुंदावला आहे.