उंबरी बाळापूर येथील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह विहिरीत आढळला
◻️ पंचक्रोशीत हळहळ; दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील संजय माधव घोलप (वय - ५०) हे मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होते. मात्र, चौथ्या दिवशी त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, उंबरी बाळापूर शिवारातील घोलप वस्ती येथील रहिवासी संजय (बापू) घोलप हे बुधवार दि. २२ ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी बेपत्ता असल्याची माहिती समाज माध्यमात टाकून दिसल्यास कळविण्याचे आवाहन करण्याबरोबरच आश्वी पोलीस ठाण्यात देखील खबर दिली होती. तसेच कुटुंबासह नातेवाईक बेपत्ता घोलप यांचा सर्वत्र शोध घेत होते.
शनिवारी (दि. २५) सकाळी ८ वाजेच्या सुमारास घोलप यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरी शेजारी असलेला घास कापण्यासाठी आलेल्या व्यक्तीला घोलप यांचा मृतदेह विहिरीत दिसला. त्यामुळे त्यांनी ही माहिती पोलीस पाटील वैशाली भगवान मैड यांना कळवली. मैड यांनी तात्काळ पोलीसांना याबाबत खबर दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संजय सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
यानंतर स्थानिकांच्या मदतीने मयत घोलप यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील रुग्णालयात पाठविण्यात आला होता. शनिवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून यावेळी नातेवाईक यांच्या सह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
दरम्यान मयत संजय घोलप यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई आणि भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. तर, याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.