सुवर्णपदक विजेते संदीप सरगर यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन
◻️ श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे सरगर यांचा गौरव
संगमनेर LIVE | भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवून देणारे पॅरा ॲथलिट सुवर्णपदक विजेते संदीप सरगर यांनी आज आपल्या आई-वडिलांसह श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. देवीच्या चरणी त्यांनी नम्रतेने नतमस्तक होत आपल्या यशाचे श्रेय श्री तुळजाभवानी देवींला अर्पण केले.
संदीप सरगर यांनी जून २०२२ मध्ये ट्युनिस (ट्युनिशिया) येथे झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रांप्री स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकत देशाचे नाव उज्ज्वल केले होते. त्यानंतर त्यांनी २०२३ मध्ये दुबई येथे झालेल्या फाझा वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रांप्रीमध्ये चौथ्या क्रमांकाने भारताचे प्रतिनिधित्व केले. याच वर्षी दुबई येथे झालेल्या आणखी एका जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रांप्री स्पर्धेत त्यांनी पुन्हा एक सुवर्णपदक पटकावले. पुढे २०२४ मध्ये शारजाह येथे झालेल्या स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकून आपल्या कामगिरीची परंपरा कायम राखली.
खडतर परिस्थितीतून वाटचाल करत यश मिळवणाऱ्या संदीप सरगर यांची कथा प्रेरणादायी आहे. त्यांनी काही काळ झोमॅटो कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम केले होते. मात्र जिद्द, कठोर परिश्रम आणि खेळाप्रती असलेली निष्ठा यांच्या बळावर त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा उंचावला.
आज देवीच्या दर्शनानंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे यांच्या हस्ते संदीप सरगर यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.