स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कॉग्रेसने स्वबळावर लढवाव्यात
◻️ जिल्हा कॉग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्वबळाचा सूर
संगमनेर LIVE | अहिल्यानगर जिल्हा हा कॉग्रेस विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे. सतत भूलथापा देऊन आणि जातीयवाद करून सत्तेवर आलेल्या महायुतीच्या पक्षांचे खरे रूप जनतेला कळाले आहे. यामुळे सर्वसामान्य जनता, नागरिक, युवक व महिला यांच्यामध्ये सत्ताधाऱ्याविरुद्ध मोठा संताप निर्माण झाला असून कॉग्रेसला अनुकूल वातावरण आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात अशी एकमुखी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली.
संगमनेर येथील अमृतनगर येथे अहिल्यानगर जिल्हा कॉग्रेस कमिटीची बैठक संपन्न झाली. याप्रसंगी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आमदार हेमंत ओगले, कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने, प्रतापराव शेळके, मधुकरराव नवले, राहुरी तालुका अध्यक्ष बाळासाहेब आढाव, अकोले तालुकाध्यक्ष शिवाजी नेहे, संभाजी रोहोकले, ॲड. पंकज लोंढे, बाबासाहेब दिघे, किरण पाटील, शब्बीर शेख, शहाजी भोसले, संभाजी माळवदे, तुषार पोटे, सचिन चौगुले, समीर काझी, राहुल उगले, नसीर शेख, दादा पाटील वाकचौरे, अरुण मस्के, नितीन शिंदे, साहेबराव बागुल, अजय फटांगरे, अरुण मस्के, रिजवान शेख, सोमेश्वर दिवटे, यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये सर्व जिल्हा कमिटी सदस्य सर्व तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था या स्वबळावर लढवण्याची एकमुखी मागणी केली.
याप्रसंगी बोलताना आमदार हेमंत ओगले म्हणाले की, कॉग्रेस पक्षाला मोठी विचारधारा आहे. सर्वाना सोबत घेऊन जाणारा हा पक्ष आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर जिल्ह्यातील नागरिकांचा मोठा विश्वास आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेमध्ये कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठी संधी आहे. कॉग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्यामुळे या सर्व निवडणुका कॉग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात अशी जिल्ह्यातील तमाम कॉग्रेसजणांची प्रमुख मागणी आहे. आमचे नेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्याकडे कॉग्रेस कार्यकर्त्याच्या भावना आम्ही मांडलेले असून त्यांचा निर्णय आम्हाला मान्य आहे.
कार्याध्यक्ष सचिन गुजर म्हणाले की, महायुतीच्या भूलथापांना लोक कंटाळले आहे. खरे तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव निश्चित होता. परंतु महायुती का जिंकली हे सर्वश्रुट आहे. यामुळे जनतेच्या मनामध्ये मोठी चीड आहे. स्थानिक स्वराज्य संस्था या कार्यकर्त्यांसाठी मोठी संधी असून कॉग्रेस पक्ष ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्ष सर्वात मोठा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
करण ससाने म्हणाले की, देशाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आता संपूर्ण देशातील वातावरण बदलले आहे. बिहारमध्ये सुद्धा कॉग्रेसचे सरकार येणार असून महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्ष एक नंबरचा ठरेल.
मधुकरराव नवले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांची विचारधारा घेऊन आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा कॉग्रेसचा विचार आहे. हा विचार लोकशाही वाचवण्यासाठी असून काँग्रेससाठी आता जनता एकवटली असल्याने आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढण्याची कॉग्रेस जणांची मोठी मागणी आहे.
शहाजी भोसले म्हणाले की, तरुणांना फसवणारी महायुती आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून बनवाबनवी करणाऱ्या या पक्षाची काळी जादू ओसरली असून यापुढील काळात तरुण जाती धर्माच्या नावावर नव्हे तर विकासाच्या नावावर निवडणुकांमध्ये साथ देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अरुण मस्के म्हणाले की, लाडक्या बहिणीच्या नावाखाली महाराष्ट्रातील तमाम महिलांचा अपमान करणारे हे सरकार असून महाराष्ट्रात स्त्रिया सुरक्षित नाहीत. अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष हा स्वबळावर लढवून नंबर एकचा पक्ष ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सचिन चौगुले म्हणाले की, महायुतीमध्ये चलबिचल आहे. ज्यांनी आयुष्यभर भाजपाचे काम केले, त्या खऱ्या कार्यकर्त्यांना दुर्लक्षित करण्यात आले आहे. बाहेरून आलेल्यांना संधी दिली जात आहे. महायुतीमध्ये आता सर्व कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे तेथे भाजपचे कोण आणि कॉग्रेसचे कोण असे काही कळत नाही. महायुतीतील अनेक इच्छुक कॉग्रेसकडून लढण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान यावेळी सर्व तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदा या स्वबळावर लढवण्याची मागणी केली.