संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांची अमृत उद्योग समूहाला भेट
◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेरचा सहकार देशाला दिशादर्शक
संगमनेर LIVE | महाविकास आघाडीचे प्रमुख नेते बाळासाहेब थोरात यांनी कायम समाजातील गोरगरीब सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी सातत्याने काम केले. थोरात परिवाराने सात दशकाहून अधिक काळ महाराष्ट्राची सेवा केली आहे. सर्वाना सोबत घेऊन जाणारे अत्यंत स्वच्छ व पारदर्शी काम करणारे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व असून त्यांच्या नेतृत्वामुळेच संगमनेर तालुक्याची सर्व क्षेत्रात मोठी प्रगती झाली असल्याचे गौरवोद्गार शरद पवार राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या खासदार आणि संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी काढले.
अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांना खासदार सुप्रिया सुळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी समवेत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संदीप वर्पे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, सुधीर मस्के, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ. सुजित खिलारी यांच्यासह विविध कार्यकर्ते व अमृत उद्योग समूहातील अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, नवीन प्रशासकीय इमारत, राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज, अमृतवाहिनी बँक, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे प्रेरणास्थळ व अमृतेश्वर मंदिर यांसह सर्व सहकारी संस्थांना भेटी दिल्या.
यावेळी खासदार सुळे म्हणाल्या की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारामध्ये स्वच्छ व पारदर्शक कामातून देशाला दिशा दिली. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मध्ये सहकारात शेतकरी व सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम होत आहे. अद्यावत साखर कारखाना, दूध संघ, बँक या सर्व सहकारांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. संपूर्ण देशाला प्रेरणादायी ठरावे असे काम येथे आहे. अत्यंत पारदर्शीपणे येथील सहकार चळवळ काम करत असून यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण झाली आहे.
थोरात साहेब हे महाविकास आघाडीतील प्रमुख नेते असून त्यांनी राज्यभरात विविध मंत्रिपदाच्या माध्यमातून आणि कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातून मोठे काम केले आहे. याचबरोबर संगमनेर तालुक्यात सातत्याने विकासाच्या योजना राबवून हा तालुका शेती, सहकार, दुग्ध व्यवसाय, शिक्षण, समृद्ध बाजारपेठ, मोठमोठी विकास कामे आणि प्रगतीतून अग्रेसर बनवला आहे.
कोणतेही काम एका दिवसात होत नाही. त्यामागे कष्ट आणि मेहनत असते. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी एकही दिवस विश्रांती न घेता सातत्याने काम केले. आणि त्यातून हा तालुका विकासातून फुललेला दिसतो आहे. संगमनेर मध्ये सुख - समृद्धी समाधान हे आहे. आणि याचे श्रेय हे बाळासाहेब थोरात यांना आहे. सत्ता येते आणि जाते काम हे सर्वसामान्य जनतेसाठी करायचे असते. लोक नेतृत्व हे फक्त निवडणुकीपुरते नसून जनतेच्या हृदयात असते. बाळासाहेब थोरात हे कायम जनतेच्या हृदयात आहेत.
यावेळी त्यांनी प्रेरणास्थळ, यशवंतीर्थ, वसंततीर्थ येथे अभिवादन केले. तर, कारखान्यांमध्ये नवीन कारखान्याची पाहणी केल्यानंतर अद्यावत अशा प्रशासकीय इमारतीची पाहणी केली. सहकारात इतकी अद्यावत आणि वैभवशाली इमारत फक्त संगमनेर मध्येच निर्माण झाले असल्याचे गौरव उद्गारही त्यांनी काढले.
निळवंडे सह पायाभूत विकास कामांमधून संगमनेर समृद्ध..
निळवंडे धरण व कालव्यासाठी सातत्याने पाठपुरावे करणारे लोकनेते बाळासाहेब थोरात आहेत. त्यांनी खरे काम केले कधीही प्रसिद्धी केली नाही. ज्यांनी काम केले नाही अशी मंडळी आता श्रेय घेत आहे. मात्र, जनतेला खरे माहित आहे. संगमनेर तालुक्यामध्ये विविध वैभवशाली इमारती, पायाभूत सुविधा, रस्ते, गावोगावी विकासाच्या योजना, ग्रामीण अर्थव्यवस्था, समृद्ध बाजारपेठ हे सर्व माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळेच उभे राहिले असून यापुढील काळात तालुका कायम त्यांच्या पाठीशी भक्कम उभा राहील असा विश्वास देखील सुप्रिया सुळे यांनी व्यक्त करून त्यांच्या नेतृत्वाची राज्याला गरज असल्याचे म्हणाल्या.