माजी मंत्री बाळासाहेब थोरात रमले जिल्हापरिषद शाळेतील चिमुकल्यांमध्ये!
◻️ पोखरी हवेली येथील भेटीदरम्यान विद्यार्थ्याशी साधला संवाद
संगमनेर LIVE | ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये मोठी गुणवत्ता आहे. इंग्रजी शिक्षणाचे वारे सर्वत्र वाहत असले तरी महाराष्ट्रातील अनेक जिल्हा परिषद शाळांमधून अत्यंत गुणवत्तेचे शिक्षण दिले जात असल्याने पुन्हा मराठी शाळांकडे ओढा सुरू झाला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेने आपली गुणवत्ता अधिक वाढवल्यास त्यांचे विद्यार्थी अधिक यशस्वी होतील. असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
तालुक्यातील पोखरी हवेली येथे जिल्हा परिषदेच्या शाळेला सदिच्छा भेट दिल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा परिषद शाळेने बांधलेल्या अद्यावत इमारतीची आणि अमृतवाहिनी संस्थेने दिलेल्या इंटरॅक्टिव्ह बोर्डची पाहणी केली. नेहमी टीव्हीवर दिसणारे बाळासाहेब आपल्या वर्गात आल्याचे विद्यार्थी आनंदाने नाचू लागले. पुष्पगुच्छ व टाळ्यांच्या गजरात या चिमुकल्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी या चिमुकल्यांशी संवाद साधला.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहजतेने कोणतीही गोष्ट न मिळाल्याने जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यामध्ये मोठी आत्मनिर्भरता निर्माण होते. स्पर्धेमध्ये हे विद्यार्थी टिकून राहतात. आज यशस्वी झालेल्या व्यक्तींमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेल्या व्यक्तिमत्त्वांची जास्त संख्या आहे.
मराठी आणि इंग्रजी या दोन्हीही भाषा महत्त्वाच्या आहेत. इंग्रजी माध्यमांकडे मध्यंतरी खूप मोठा ओढा निर्माण झाला होता. परंतु जिल्हा परिषद शाळेची वाढलेली गुणवत्ता आणि त्यातून दिले जाणारे सहजतेचे शिक्षण यामुळे अनेक विद्यार्थी पुन्हा इंग्रजी शाळांमधून मराठी शाळेत आले आहे आणि संगमनेर तालुक्यात ही संख्या आनंददायी आहे.
अगदी गोरगरीब नागरिक व वाढीवस्तीवरील विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे याकरता शिक्षणाचा मूलभूत अधिकार आपण राबविला. याचबरोबर केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांबरोबर आपल्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी याकरता बेस्ट ऑफ फाईव्हचा निर्णय लागू केला.
जिल्हा परिषद शाळेतील गुणवत्ता सुधारण्यासाठी आपण कायम आग्रह केला. याकरता तालुक्यात इंग्रजी व गणित या विषयात अधिक प्राविण्य यावे याकरता विशेष योजना राबविण्यात आली. यातून तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता सुधारण्याचे समाधान आहेच. याचबरोबर आपल्या तालुक्यातील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वीपणे काम करत असल्याचा अभिमानही असल्याचे ते म्हणाले.
सरकारने पायाभूत शिक्षणावर अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे यावेळी माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले असून या प्रसंगी त्यांनी पोखरी शाळेने राबवलेल्या विविध उपक्रमाबद्दल कौतुक केले. याप्रसंगी डॉ. नारायण कोल्हे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.