ज्ञानगंगा विद्यानिकेतन येथे तीन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
◻️ मांचीहिल संकुलात विद्यार्थी विकास आणि नवीन शैक्षणिक धोरणांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
संगमनेर LIVE | शिक्षण क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांची माहिती शिक्षकांना व्हावी, विद्यार्थ्याचा सर्वागीण व्यक्तिमत्त्व विकास कसा करावा आणि आगामी शैक्षणिक धोरणे प्रभावीपणे कशी राबवावीत या उद्देशाने संगमनेर तालुक्यातील मांचीहिल शैक्षणिक संकुलातील ज्ञानगंगा विद्यानिकेतन येथील महाराजा यशवंतराव होळकर पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत राज्यातील नामवंत व्याख्यात्यांनी शिक्षकांना बहुमोल मार्गदर्शन केले.
स्पर्धा परीक्षा ते पर्यावरणातून शिक्षण..
या तीन दिवसीय कार्यशाळेचा मुख्य भर विद्यार्थी मूल्यमापन, स्पर्धा परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व विकासावर होता. पहिल्या सत्रात दत्ता आरोटे यांनी स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन केले. ज्या विद्यार्थ्याना शालेय स्तरावर यश मिळत नाही, त्यांनी अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करावी, कारण अनेक उपयुक्त परीक्षांची माहिती अजूनही विद्यार्थ्याना नाही, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
डॉ. सदानंद डोंगरे यांनी ‘विद्यार्थी मूल्यमापन’ या किचकट विषयावर शिक्षकांना सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. त्यानंतर राजीव देशमुख यांनी ‘पर्यावरणातून शिक्षण' या विषयावर बोलताना, विद्यार्थी हा निसर्गाच्या सान्निध्यात अधिक प्रभावीपणे शिकतो, त्यामुळे परिसरातील पर्यावरणाचा शिक्षणासाठी कसा उपयोग करावा, यावर प्रकाश टाकला.
डॉ. सौ. राजश्री देशमुख यांनी 'व्यक्तिमत्त्व विकास' या महत्त्वाच्या पैलूंवर मार्गदर्शन केले.
राष्ट्रपती पुरस्कार विजेत्यांचे विशेष व्याख्यान..
प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोपाच्या दिवशी रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि राष्ट्रपती पारितोषिक विजेते सर्जेराव मते यांचे विशेष व्याख्यान पार पडले. त्यांनी ‘शिक्षक व्यक्तिमत्त्व विकास' या विषयावर बोलताना शिक्षकांना स्वतःच्या विकास प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले. तसेच, शासनाकडून शिक्षकांना देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांविषयी सविस्तर माहिती दिली.
दरम्यान या यशस्वी कार्यशाळेसाठी संस्थेचे संस्थाप्रमुख अॅड. शाळीग्राम होडगर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य तथा संस्थेचे अध्यक्ष विजय पिसे, संचालक सुनील आढाव, जनरल मॅनेजर किसन हजारे, उपप्राचार्य गंगाधर चिंधे, मुख्याध्यापिका योगिता दुकळे, शीतल सांबरे आणि पंडित डेंगळे यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत गमे यांनी केले.