रायतेच्या वैभवात भर! थोरात यांच्या हस्ते आकर्षक ‘स्वागत कमानी'चे लोकार्पण
◻️ स्वागत कमानीमुळे गावाचे रूपडे बदलले - बाळासाहेब थोरात
संगमनेर LIVE | सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना नेहमीच ऊस उत्पादक, शेतकरी आणि सभासद यांच्या हिताचे निर्णय घेत आला आहे. या कारखान्याने कायम तालुक्याच्या विकास कामात मोलाचे योगदान दिले आहे. आता रायते गावाने दाखवलेल्या एकजुटीमुळे आणि नवीन स्वागत कमानीमुळे गावच्या वैभवात भर पडली आहे, असे प्रतिपादन माजीमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील रायते येथे आदिशक्ती मुक्ताई माता मंदिराच्या परिसरात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने नागरिकांच्या आग्रहाखातर उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीचे लोकार्पण माजीमंत्री बाळासाहेब थोरात व ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून रायते ग्रामस्थांची थोरात कारखान्याकडे स्वागत कमानीची मागणी होती. नवरात्र उत्सवादरम्यान आदिशक्ती मुक्ताई माता देवीचा कार्यक्रम येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या काळात भाविकांसाठी दररोज कीर्तन, भजन आणि महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे नियोजन नवरात्र कमिटी व युवकांच्या वतीने केले जाते. गावची ही धार्मिक बाब खरोखरच कौतुकास्पद आहे.
थोरात कारखान्याने केवळ साखर उत्पादनच नव्हे, तर अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात देत तालुक्याच्या विकासात कायम महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. रायते गावाला मिळालेल्या या नवीन स्वागत कमानीमुळे गावाचे रूप अधिक आकर्षक झाले असून, गावाच्या वैभवात भर पडली असल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान या लोकार्पण सोहळ्याचे प्रास्ताविक मार्केट कमिटीचे संचालक कैलास पानसरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी रायते गावातील नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.