लावणी ते अभंग: संतकृपेने फुललेले एक अलौकिक जीवनपुष्प - ह.भ.प. बबनदादा पुलाटे
◻️ अध्यात्म आणि मातीची नाळ जपणारे दुर्गापूरचे वारकरी
संगमनेर LIVE |
सदगुरु आनंदा बाबा यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या, रक्ताच्या नात्याची वीण घट्ट ठेवणाऱ्या आणि दुर्गामातेचे जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, महाराष्ट्रातील राहाता तालुक्यातील एकमेव दुर्गापूर या तीन हजार लोकवस्तीच्या गावाने देव उठनी एकादशीच्या मंगल पर्वावर आपला एक तेजस्वी वारकरी, ह.भ.प. बबनदादा जगन्नाथ पुलाटे, यांना अखेरचा निरोप दिला. 'संत कृपा झाली इमारत फळा आली' या उक्तीचा अर्थ आपल्या जीवनात सार्थ करणाऱ्या बबनदादांचे वृद्धापकाळाने झालेले निधन, हे केवळ दुर्गापूरकरांसाठी नव्हे, तर अवघ्या प्रवरा परिसरासाठी एक मोठी अध्यात्मिक हानी आहे.
स्वानंद छंदीफंदी ते संवादिनीचे सात्विक सूर..
उमेदीच्या काळात गावात नाट्यकलेच्या माध्यमातून रसिकांची सेवा करणारे आणि रंगमंचावर आपल्या कसदार अभिनयाने वठवलेली पात्रे ओळखूही न येण्याइतके तल्लीन होणारे बबनदादा, त्यांच्या नाट्यवेड्या व्यक्तिमत्त्वाने अनेकांना मोहून टाकले होते. तीच हार्मोनियम, तोच वाजवणारा हात, पण देवाचे नियोजन काही वेगळेच होते. सदगुरु गंगागिरीजी महाराज व सदगुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपेने आणि हरिनाम सप्ताहाच्या प्रभावाने त्यांच्या जीवनाची दिशा बदलली.
त्यांच्या जीवनप्रवासातील हा अलौकिक बदल समाजासाठी एक ज्वलंत आदर्श ठरला: "लावणी भुलली अभंगाला"! नाटकात गाण्यांच्या चालीवर लीलया फिरणारी बोटे आता त्याच संवादिनीवर अभंगाचे सात्विक सूर आळवू लागली. 'विषय तो त्यांचा झाला नारायण' या भावाने त्यांनी तुळशी माळ धारण केली आणि ते पंढरीचे निष्ठावान वारकरी बनले. चिखलात रुतलेल्या पावलांनी स्वानंदात केलेली छंदपूर्ती मागे टाकून, त्यांनी भक्तीच्या मेळ्यात दंग होत समाजासाठी एक वेगळा सामाजिक आदर्श उभा केला की, "इच्छा असेल तर बदल नक्की होतो."
सेवा, निष्ठा आणि वारसा..
'तुका म्हणे घालू तयावरी भार' या दृढ निष्ठेने त्यांनी भजनासाठी पायाला भिंगरी बांधून गावोगावी परमार्थ सेवा केली. श्रवण भक्तीने ते जमेल तसे प्रवचन-निरूपण देखील करत. लोणी येथील प्रवरा बँकजवळ, प्रवासाचा शीण विसरून, तीनचाकी सायकलवरच्या जुन्या मित्राची (ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पुलाटे) कळजी घेणारे त्यांचे प्रेमळ व्यक्तिमत्त्व, त्यांच्या निरपेक्ष सेवाभावाची साक्ष देते.
त्यांच्या अध्यात्मिक सेवेची उंची आदर्श माता सौ. सिंधुताई एकनाथराव विखे पाटील आणि सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या वस्तीवरील भजनात संवादिनी संगतीची जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करताना अधिक वाढली. यामुळे 'संसार सुखाचा झाला गे माये' असा कौटुंबिक आधार त्यांना मिळाला आणि विखे पाटील परिवाराचा स्नेह कायम त्यांच्या पाठीशी उभा राहिला. मुलगा विलास व नातू यांच्या जाण्याचा मोठा आघात सोसूनही त्यांची पत्नी, मुले आणि नातवंडे खंबीरपणे उभी राहिली. त्यांचा समाजसेवेचा वारसा नातू जयदीप (आरोग्य अधिकारी), स्नुषा उपसरपंच सौ. सुशीला वहिनी, प्रा. शरद आणि राजेंद्र यांच्या रूपात आजही जपला जात आहे, ही दादांची खरी ओळख आहे.
प्रतिकूल स्थितीतही संतकृपेने आणि निस्सीम सेवेने चिखलातही कला आणि भक्तीचे कमळ फुलू शकते, यावर दृढ विश्वास निर्माण करणारे ह.भ.प. बबनदादा पुलाटे यांनी देव उठनी एकादशीला देह ठेवून जगाचा निरोप घेतला. परब्रह्म पांडुरंग कृपेने, माऊली ज्ञानोबा व जगद्गुरू तुकोबा यांच्या आशीर्वादाने परमेश्वर चरणी त्यांना शाश्वत स्थान लाभो, हीच कामना.
दरम्यान त्यांच्या निधनानंतर राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, सौ. शालिनीताई विखे पाटील, डॉ. राजेंद्र विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील, दुर्गापूरकर परिवार, प्रवरा परिवार आणि वारकरी भक्तजन परिवारांने श्रद्धांजली अर्पण केली आहे.
लेखक :- यशवंत पुलाटे,
ज्येष्ठ साहित्यिक तथा संस्थापक प्रवरा शब्दस्नेही व्यासपीठ