लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी घेतले श्री खंडोबाचे मनोभावे दर्शन
◻️ चंपाषष्ठीच्या पवित्र पर्वावर संगमनेर दुमदुमले
संगमनेर LIVE | श्री खंडोबाच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या चंपाषष्ठीच्या पावन निमित्ताने संगमनेर शहरात भक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. संगमनेर येथील तेलीखुंट परिसरात मित्र प्रेम तरुण मंडळ (होलम भक्त) यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य भंडारा कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी आवर्जून उपस्थिती लावत धार्मिक एकतेचा संदेश दिला.
धार्मिक सोहळ्यात उपस्थिती..
चंपाषष्ठी हा दिवस खंडोबा देवाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, ज्यामध्ये देव-दानवांच्या युद्धातील खंडोबाच्या विजयाचे आणि मार्तड भैरवाच्या अवताराचे स्मरण केले जाते. या धार्मिक सोहळ्याचे महत्त्व अधोरेखित करत मित्र प्रेम तरुण मंडळाने (होलम भक्त) तेलीखुंट येथे भंडारा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या भक्तीमय वातावरणात लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सहभाग घेतला. त्यांनी सर्वप्रथम मोठ्या भक्तिभावाने श्री खंडोबाचे मनोभावे दर्शन घेतले आणि 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या जयघोषात भाविकांशी संवाद साधला.
भाविकांशी संवाद आणि शुभेच्छा..
यावेळी थोरात यांनी मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि उपस्थित असलेल्या हजारो भाविकांची भेट घेतली. चंपाषष्ठीच्या मंगलमय पर्वाच्या त्यांनी उपस्थितांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बोलताना त्यांनी, “श्री खंडोबाच्या कृपेने सर्वाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि मंगलकार्याची भरभराट नांदो. या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन मला आनंद झाला," अशी प्रार्थना व्यक्त केली.
दरम्यान थोरात यांच्या उपस्थितीमुळे मित्र प्रेम तरुण मंडळ आणि परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते.