‘सिटीजन विल’च्या धर्तीवर संगमनेरचा विकास आराखडा

संगमनेर Live
0
‘सिटीजन विल’च्या धर्तीवर संगमनेरचा विकास आराखडा

◻️ आमदार सत्यजीत तांबे यांचा गंगामाई घाटावर नागरिकांशी थेट संवाद!


​संगमनेर LIVE | ​प्रवरानदीच्या सुंदर तीरावर वसलेल्या आणि सुशोभित झालेल्या गंगामाई घाटाचा परिसर आज संगमनेर शहराचे वैभव ठरला आहे. याच उत्साहाच्या वातावरणात आमदार सत्यजीत तांबे यांनी शहरातील विविध क्षेत्रांतील नागरिकांशी थेट संवाद साधला. 

यावेळी जेष्ठ नागरिक व तरुणांनी तांबे यांनी अनुवादित केलेल्या 'सिटीजन विल' (Citizen Will) या गाजलेल्या पुस्तकाच्या आधारावर संगमनेर शहराचा आगामी नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करण्याची महत्त्वपूर्ण सूचना केली.

​व्यापारी, डॉक्टर, इंजिनियर्स, युवा उद्योजकांशी चर्चा..

​गंगामाई घाट परिसरामध्ये आयोजित या संवाद सत्रात शहरातील व्यापारी, डॉक्टर, इंजिनीअर, युवक उद्योजक आणि शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा संवाद अत्यंत मोकळ्या वातावरणात, हसत-खेळत पार पडला.

​आमदार सत्यजीत तांबे यांनी कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅवीस न्यूसन यांच्या 'सिटीजन विल' या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला आहे. या पुस्तकाने राज्यातील तरुणांमध्ये आणि जागरूक नागरिकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. 'सिटीजन विल' सुशासनामध्ये नागरिकांचा सार्वजनिक सहभाग किती महत्त्वाचा आहे, नागरिक आणि सरकारचे परस्पर संबंध कसे असावेत, यावर उदाहरणांसह दृष्टिकोन मांडते. नागरिकशास्त्राच्या पारंपरिक अभ्यासापेक्षा वेगळ्या प्रकारच्या लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणारे हे पुस्तक आहे.

​राजकारणविरहित विकासाची हाक..

​नागरिकांच्या सूचनांचा आदर करत आमदार तांबे यांनी स्पष्ट केले की, संगमनेर शहराचा आगामी विकास आराखडा या पुस्तकातील तत्त्वांप्रमाणेच निश्चितपणे तयार करता येईल.

​ते म्हणाले, “संगमनेर शहराला एक गौरवशाली विकासाची परंपरा आहे. हे शहर आपले गाव आहे आणि त्याचे 'गावापण' जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. यासाठी प्रत्येकाने राजकारण विरहित एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.”

​सर्व नागरिकांच्या सूचनांचा कायम आदर करून पुढील प्रशासन अत्यंत कार्यक्षमतेने काम करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांनी यावेळी आपल्या शहराची वैभवशाली वाटचाल जपण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मनोगत व्यक्त केले.

​व्हिजन संगमनेर २.०

​आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली सर्व नागरिकांनी एकत्र येऊन 'संगमनेर सेवा समिती' ची स्थापना केली आहे. या समितीने 'संगमनेर २.०' हे नवीन व्हिजन शहरासमोर ठेवले असून त्याला सर्व समाज घटकांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये युवक आणि महिलांचा मोठा सहभाग हे या व्हिजनचे मुख्य वैशिष्ट्य ठरले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !